पुणे : इचलकरंजी येथील थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स आर्टिस्ट डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी साकारलेल्या 14 थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्सचे येत्या 16 ते 19 एप्रिल दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे पुण्यातील शिवाजी ट्रेल या संस्थेने आयोजित केले आहे. दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 8.00 या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना विनामूल्य पाहता येईल, अशी माहिती शिवाजी ट्रेल संस्थेचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर, थ्रीडी कोलाज पोर्टेट्स आर्टिस्ट डॉ. ज्योती बडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुकुंद उत्पत, संजय लाहोटी, डॉ. दशावतार बडे आदी उपस्थित होते.
थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स विश्वातील डॉ. ज्योती बडे यांनी शिवस्मृती नामक थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्समध्ये एकूण 14 भव्य पोर्ट्रेट्स साकारली आहेत. शिवचरित्रातील प्रसिद्ध चित्रकार दलाल यांच्या मूळ चित्रावरून ही पोर्ट्रेट्स साकारली असून, ती पाहताना डॉ. ज्योती बडे यांचा चित्रकलेचा गाढा अभ्यास दिसून येतो. डॉ. ज्योती बडे यांचा हा अविष्कार अनोखा व पहिलाच असून, चित्रकलेच्या अभ्यासकांसह चित्रकला रसिकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मिलिंद क्षीरसागर यांनी केले आहे.
या प्रदर्शनास अनेक मान्यवरांसोबत शिवाजी ट्रेल संस्थेचे बँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल कोल्हे हे देखील भेट देणार आहेत, अशी माहिती डॉ. बडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, इतिहास संशोधक डॉ. अमर आडके, संभाजी भिडे गुरुजी यांनी ही कलाकृती पाहून या पोर्ट्रेट्सची प्रशंसा केली आहे. अशा अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाची खासियत अधोरेखीत केली आहे. पुणेकरांसाठी दि. 16 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत खुले राहणार आहे. रसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही डॉ. ज्योती बडे यांनी केले आहे.

