पुणे : ‘लोटस बिझनेस स्कूल’ने ‘आयपीसी बॉर्दो, फ्रान्स’च्या सहकार्याने वाइन अँड स्पिरीट क्षेत्रात भारतातील तरुणाईचे कौशल्य व स्पर्धात्मकता यांना उत्तेजन देण्यासाठी पुण्यात ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वाइन अँड स्पिरीट बिझनेस मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. भारतातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील करिअर उज्ज्वल बनवण्यासाठी परदेशातील भागीदारांसमवेत काम करुन मौल्यवान अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळेल. अभ्यासक्रमाची रचनाच अशी सुनियोजित आहे, की विद्यार्थ्यांना ही पदवी घेण्यापूर्वीच फ्रान्समध्ये विद्यावेतनासह उमेद्वारीची संधी व व्यावसायिक अनुभव घेता येईल.
या ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वाइन अँड स्पिरीट बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन ‘इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कमर्शियल सर्व्हिसेस विभागाचे व्यवस्थापक ब्रुनो ब्राँकॉर्ड यांच्या हस्ते नुकतेच येथे शानदार आणि रंजक कार्यक्रमात झाले. अभ्यासक्रमाला असलेला वाव, तसेच तो पूर्ण केल्यानंतर फ्रान्स व भारतात उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी याविषयी श्री. ब्राँकॉर्ड यांनी विवेचन केले. कार्यक्रमाला ‘आलियान्झ फ्रान्झे द पुणे’च्या अभ्यासक्रम संचालक सोन्या गॉल, ‘कॅम्पस फ्रान्स, पुणे’च्या शिक्षण सल्लागार रश्मी आर्वीकर व ‘युरोपियन युनियन’चे कामकाज प्रमुख प्रसाद देशपांडे आदी मान्यवर पाहुणे उपस्थित होते. सोन्या गॉल यांनी याप्रसंगी फ्रेंच भाषेचे महत्त्व विशद केले, तर रश्मी आर्वीकर यांनी फ्रान्समधील शिक्षण व करिअरच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
‘लोटस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे कार्यकारी संचालक चारुदत्त बोधनकर यांनी ‘लोटस बिझनेस स्कूल’ आणि परदेशी संस्थांदरम्यानच्या यशस्वी सहयोगात प्रेरक शक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कार्यक्रमात ते म्हणाले, की जग आज खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हिलेज झाले असून लोक व्यक्तीगत व व्यावसायिक उद्दिष्ट्ये वृद्धिंगत करण्यासाठी सर्व सीमा ओलांडतात, असा ‘लोटस’चा दृढ विश्वास आहे. याच तत्त्वावर ‘लोटस’ने जागतिक संस्थांशी आणि भागीदारांशी सहयोग करुन उभरत्या व्यवस्थापकांसाठी संधी निर्माण केल्या आहेत. भारतीय इच्छुकांना युरोपीय कौशल्याचा अनुभव घेण्याची ही खास संधी आहे. अशी तीव्र आकांक्षा व तीक्ष्ण बुद्धी असलेल्या व्यक्तींना या अभ्यासक्रमांमुळे जागतिक पातळीवर उत्कृष्टता प्राप्त करता येईल व जगातील सर्वोत्तम व्यक्तींसमवेत कामही करता येईल. सध्या आम्ही ‘आयपीसी बॉर्दो, फ्रान्स’शी सहयोग केला असून त्याअंतगर्त वाइन अँड स्पिरीट उद्योगाची गरज पूर्ण करणारा एक वर्ष मुदतीचा अभ्यासक्रम सादर केला आहे.
‘लोटस बिझनेस स्कूल’ने या अभ्यासक्रमाची पहिली बॅच गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुरु केली असून दुसरी बॅच येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे.
‘लोटस बिझनेस स्कूल‘विषयी :
‘लोटस बिझनेस स्कूल‘, पुणे हे प्रीमियर बिझनेस स्कूल ‘सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी’शी संलग्न व्यवस्थापन शिक्षणक्रम देते, ज्यांना ‘एआयसीटीई’, तसेच ‘डीटीई’ची मान्यता आहे. ही संस्था दर्जेदार शिक्षणावर उच्च भर देते.
‘लोटस बिझनेस स्कूल’ हा ६०० कोटी रुपये उलाढालीच्या ‘भाईश्री ग्रुप‘चा भाग आहे. हा समूह गेल्या ४० वर्षांपासून एफएमसीजी, वस्त्रोद्योग, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, फूड अँड पॅक्ड स्नॅक्स आदी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.

