पुणे :- आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी आज दिल्या.
आळंदी कार्तिकी यात्रा 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेबर 2019 या कालावधीत होणार असून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, खेडचे उपविभागीय अधिकारी एस.बी. तेली, श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील, मुख्याधिकारी समीर भूमकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर, विश्वस्त अभय टिळक आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, आळंदी कार्तिकी यात्रेचे नियोजन करताना स्वच्छता,सुविधा , सुरक्षा, आरोग्य सुविधा या बाबींवर भर दिला जाणार आहे.त्यासाठी नियोजन करताना सर्व विभागांच्या प्रमुख अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा. आळंदी येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना विद्युत व्यवस्था, पालखी मार्गावरील स्वच्छता करणे, तात्पुरते शौचालयांमध्ये वाढ करणे,रुग्णवाहिका, औषधे यांची उपलब्धता, अग्निशामक व्यवस्था आदींबाबतही त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
तीर्थक्षेत्र आळंदीत आलेल्या भाविकांसह नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी तसेच यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आळंदी नगरपरिषद सभागृहात सोहळ्याच्या तयारी साठी नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.