पुणे, : नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ५४८ वरील ३.८८ किलोमीटर च्या रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामाच्या कोनशिलेचे अनावरण कळ दाबून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्र राजे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूलासाठी 135 कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी दिली जाईल. तसेच कात्रज येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास होवू नये, यासाठी ध्वनीरोधक यंत्रणा देखील बसविण्याबाबत विचार होईल. नवले पूल ते कात्रज रस्ता सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून 7 मीटर ऐवजी 10 मीटरचा भुयारी मार्ग बनवणे व अन्य आवश्यक कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल. पुणे-सातारा महामार्गाची कामे पूर्ण होण्यात असणा-या अडचणी दूर करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक घेऊन या मार्गाचे काम गतीने मार्गी लावण्यात येईल, असे सांगून श्री गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत असून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून नवी पिढी तयार व्हावी, या हेतूने शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे प्रास्ताविकात म्हणाले, वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामासाठी ६९ कोटी रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, व्हेहीक्युलर अंडर पास, पादचारी भुयारी मार्ग, नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा , बस निवारा आदी कामे करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, व या भागातील नागरिक उपस्थित होते.