पुणे– खांबावरुन पडून जखमी झालेल्या आणि अपंगत्व आलेल्या, घरात कमावणारे कोणी
नसल्याचे ओळखून स्वत: किर्तनाचे कार्यक्रम करुन वडिलांच्या आजारपणाचा खर्च भागवणाऱ्या मुलींची
माहिती वृत्तपत्रातून वाचनात आल्याने मुलीला मदत करण्याचा विचार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या मनात आला आणि त्या मुलीस 50 हजार रुपयांची मदत करुन त्यांनी हा विचार आज प्रत्यक्षात उतरवला. या मदतीचा धनादेश राज्यपालांच्या पत्नी सौ.विनोदा यांच्याहस्ते आज देण्यात आला.
सोलापूर जिल्हायातील करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील सपना बाळासाहेब साखरे या बाल
किर्तनकाराला मदत देण्यात आली. सपना साखरे आळंदी देवाची येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. येथील राजभवनात अगदी साध्यापणे पार पडलेल्या
कार्यक्रमाच्यावेळी सपना साखरेची आई, आजोबा, बहिण व शिक्षक उपस्थित होते.
सपना साखरेचे वडील आजारी आहेत. त्यांच्यावर सोलापूर व पुणे येथील विविध रुग्णालयांमध्ये
वैद्यकीय उपचार चालू आहेत. वडिलांच्या आजारपणावरील खर्च भागविता यावा यासाठी नववी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सपना साखरेने पुढाकार घेतला आणि लहानपणापासून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचे महाराजांचे अभंग गाऊन किर्तनाचे कार्यक्रम केले. आपल्या किर्तनातून सपना साखरे स्त्रिभ्रुण हत्या करु नका, आई वडिलांची सेवा करा असा संदेश देते.
सपनाच्या हातात धनादेश देऊन श्रीमती विनोदा यांनी सपनाच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरवला.
तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तिच्याशी संवाद साधला. आणि तुझी स्वप्न साकार होवोत असा
आशिर्वादही दिला.
राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सपना साखरेशी दिलखुलासपणे संवाद साधला. वडिलांची प्रकृती
कशी आहे?, शाळेत शिकताना काही अडचणी आहेत का?, आवड-निवड काय अशी विचारणा करुन शासनातर्फे तिला सर्व प्रकारची मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. सपना साखरेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून तरुण-तरुणींनी त्याचे अनुकरण करावे असे आवाहन केले. सपनाच्या कार्याला माध्यमांनी विशेष प्रसिध्दी देण्याचे आवाहन केले. ज्या शाळेमध्ये सपना साखरे शिकत आहे त्या शाळेला भेट देण्याचे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
स्त्रिभ्रुण हत्या थांबविणे ही काळाची गरज आहे, असे सपना साखरेने यावेळी सांगितले. यासाठी
समाजातील सर्वांनी पुढे यावे असे सांगून आई वडिलांचा सांभाळ मुलांपेक्षा मुलगी जास्त चांगल्याप्रकारे करु शकते हे तिच्या कार्यातून दाखवून दिले असल्याचे सांगितले. यावेळी सपनाने राज्यपालांनी सूचना केल्यानुसार संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून दाखविला.
सपना साखरेची आई, बहिण, शाळेचे मुख्याध्यापक पी.जी.गावडे, संस्थेचे सचिव उत्तम चव्हाण,
शिक्षिका श्रीमती अदिती निकम, अश्विनी शिंदे याप्रसंगी उपस्थित होत्या.


