पुणे : शाळा स्वच्छ आहे का, शाळा आवडते का, शाळेतले काय आवडते, शाळेमधे
पिण्याचे स्वच्छ पाणी आहे का, कोणता विषयक आवडतो, शाळांतील सुविधांबाबत अथवा
सुधारणांबाबत आपणास मला काही सांगायचे आहे काय असे प्रश्न विचारुन राज्यातील विविध
उपक्रमशील शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजथेट संवाद साधला.
उन्हाळयाच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा आज सुरु झाल्या. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने
यानिमित्ताने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शालेय विद्यार्थी, शिक्षक व
पालक यांच्याशी संवाद घडवून आणला.
डिजीटल शाळा विषयावर जिल्हा परिषद शाळा, पाष्टेपाडा, शहापूर,जि.ठाणे, रचनावादी
शाळा या विषयावर पेठ,जि.लातूर, लोकसहभागासाठी केंजळ,जि.पुणे , ऊस तोड कामगारांच्या मुलांचे
स्थलांतरण थांबवल्याबद्दल वरवंडी तांडा,जि.औरंगाबाद, समाज सहभागातून संगणक प्रयोग शाळा
उभारणीसाठी निकुंभे,जि.धुळे आणि डिजीटल क्लासरुम निर्मितीसाठी भागसरी,जि.नंदूरबार येथील
शाळांतील विद्यार्थ्यांशी आज मुख्यमंत्र्यांनी थेट संपर्क साधला. यावेळी विद्यार्थ्यांशी झालेल्या
संवादातून मुख्यमंत्र्यांनी शाळेतील उपलब्ध सुविधा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना शाळांतील विद्यार्थी प्रचंड उत्साही
होते. तसेच त्यांच्या चेहरऱ्यावर कुतुहलसुध्दा होते. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी
विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली. पालकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाल्यांच्या समस्याजाणून घेतल्या. शिक्षकांनी एक पिढी तयार करतो आहोत या भावनेने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे अशीसूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रकाश भिकन ठाकूर, दाभाडी,जि.नाशिक यांचा डिजीटल
रेडीओ तयार केल्याबद्दल, अलंकार वारघडे,सरवली.जि.ठाणे यांनी ई-लायब्ररी निर्माण केल्याबद्दल व
रणजितसिंह डिसले, परीतावाडी.जि.सोलापूर यांनी पाठयपुस्तकामध्ये क्युआर कोड निर्माण
केल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी तयार
केलेले नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यातील सर्व शाळांमधे पोहोचविण्यात येतील असे सांगून यामुळे
विद्यार्थ्यांची ज्ञानवृध्दी होण्यास मदत होईल, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षकांना
सांगितले. या उपक्रमांतून राज्यातील शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी
शिक्षकांना केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. प्रगत
शैक्षणिक कायक्रमावर आधारीत “जिवन शिक्षण” मासिकाचे विमोचन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, खासदार अनिल शिरोळे,
आमदार माधुरीताई मिसाळ, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, विभागीय
आयुक्त एस.चोक्कलिंगम, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी सौरभ राव,
महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,
एनसीईआरटी संचालक गोविंद नांदेडे, माध्यमिक व उच्च् माध्यमिक विभागाचे संचालक एन.के.जरग,शिक्षण सहसंचालक एन.एन.नांगरे आदी अधिकारी उपस्थित होते.