पुणे- सिगारेट्स आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन कायद्यांतर्गत (कोट्पा) जिल्ह्यात या आर्थिक वर्षात एकूण 330 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध कलमांतर्गत 91 हजार 905 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, समन्वय अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. मिलींद भोई, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, जीवन राजगुरु, डॉ. पी.बी. जोशी, तुषार तांदळे, अपर्णा शेंडकर, ज्योती धमाळ, मुकूंद अयाचित, राहूल मणियार,अनिता वाघचौरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
कोट्पा कायद्यांतर्गत कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. बंदीचे उल्लंघन करणा-यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येतो. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असून पहिला गुन्हा असेल तर 2 वर्षापर्यंत शिक्षा व किंवा 1 हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा असेल तर 5 वर्षांपर्यंत शिक्षा व किंवा 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात येतो. 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे, तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. याशिवाय सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनावर निर्देशित धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनादेण्यात आल्या.
राज्याला गणेशोत्सवाची उज्ज्वल परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनासाठी गणेशोत्सवाची मदत होऊ शकते, लक्षात घेवून यंदा गणेशोत्सवामध्ये ‘तंबाखूमुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना राबविण्यात येत असून त्याच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. नांदापूरकर यांनी केले.
ग्रामीण स्तरावर तंबाखूमुक्त समुपदेशन केंद्र, तंबाखूमुक्त आरोग्य संस्था याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. तंबाखूपासून सुटका करुन घेण्यासाठी तंबाखूमुक्त समुपदेशन केंद्र, जिल्हा रुग्णालय, पुणे अथवा 1800 112356 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

