मुंबई: मुंबईतील नद्या, नाले पुढील सहा महिन्यात सुंदर आणि स्वच्छ करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईतील नदी प्रदूषण आणि राज्यातील प्रदुषित नदी पट्टे या संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, मिठी, दहिसर, बोईसर या मुंबईतील नद्या स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त होण्यासाठी सहा महिण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, गाळ, कचरा काढणे, सांडपाणी बंद करणे, कारखान्याचे रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, नदी काठाने झाडे लावणे, नदी परिसरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सुविधा निर्माण करणे, बसण्यासाठी खुर्च्याची सोय करणे, त्यामुळे कुणीही कचरा टाकणार नाही. परिसरात अतिक्रमणे होणार नाहीत. नदी परिसराला पर्यटन स्थळांचे स्वरुप येईल. याच वेळी पर्यावरण मंत्र्यांनी राज्यातील नद्या स्वच्छतेचा आढावा घेऊन घरातील सांडपाणी आणि कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपस्थित महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पंचगंगा, चंद्रभागा, भीमा, मुळा-मुठा, बिंदुसरा या प्रमुख नद्यांच्या प्रदुषित पाण्यावर चर्चा झाली. या बैठकीला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.