पुणे दि. 25- नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासन महसूल, मदत व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे, नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहसचिव शामसुंदर पाटील, सह नोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे, अप्पर मुद्रांक नियंत्रक सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या विकासासाठी राज्याचे आर्थिक उत्पन्न महत्वाचे असते. नोंदणी व मुद्रांक विभागाने 2017-18 या वर्षात विक्रमी 26 हजार 494 कोटी रुपयांचा महसूल जमा करुन गौरवास्पद काम केले आहे. त्याबद्ल नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन ही श्री पाटील यांनी यावेळी केले.
श्री पाटील पुढे म्हणाले, या विभागात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे दिलेल्या उद्दीष्टा पेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजर्षी शाहु महाराजांच्या काळात जनतेच्या गरजा व समस्या ते सहज ओळखत असत. नागरिकांच्या गरजा आणि समस्या तसेच अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन प्रसत्नशील आहे.
यावेळी श्री कवडे यांनी मुदांक व नोंदणी शुल्क विभागाच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती बोंदार्डे यांनी केले.
नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक सोन्नाप्पा यमगर, सह दुय्यम निबंधक तानाजी गंगावणे, सह जिल्हा निबंधक अनुक्रमे विजय भालेराव ,गोविंद कराड, अनिल पारखे, नगर रचना सहसंचालक सुधाकर नांगनुरे, यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
मुंद्रांक विभागाचे सर्व विभागीय तसेच जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल यादव यांनी केले तसेच आभार नोंदणी उपमहानिरीक्षक सुप्रिया करमरकर यांनी मानले.

