पुणे – स्त्री ही समाजाची अविभाज्य घटक असून घर सांभाळून कार्यालयीन जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचे काम महिलाच करु शकतात, असा विश्वास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. दळवी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, वैमानिक पुनव गोडबोले, सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कलाकार सायली संजीव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मतदान नोंदणीच्या कामामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री. दळवी म्हणाले, विविध क्षेत्रात आपले कतृर्त्व सिद्ध करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटवला आहे. समाजात महिलांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. उच्चपदावर काम करणाऱ्या उच्च शिक्षित महिलांनाही कौटुंबिक छळ व त्रास सहन करावा लागत असल्याची उदाहरणे समाजात पहायला मिळतात, ही बाब खेदजनक असून ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
महिलांनी मनापासून कोणतीही गोष्ट करावयाची ठरवली तर त्या निश्चितच यशस्वीपणे पुर्ण करु शकतात. यासाठी सर्वप्रथम ध्येय निश्चित करा आणि आत्मविश्वास बाळगून ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करा, असे आवाहन करण्याबरोबरच महिलांनी तणावमुक्त जीवन जगावे, असा सल्ला श्रीमती शुक्ला यांनी दिला.
श्री.राव म्हणाले, ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जाते, तेथेच प्रगती नांदते, हे प्राचीन काळापासून आपण पाहत आलो आहोत. ‘नारी इश्वराची सर्वश्रेष्ठ संकल्पना आहे’, यावर माझा विश्वास आहे. यूपीएससी मध्ये या विषयातच मी अव्वल होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कुटुंब, समाज आणि देशाप्रती आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आजच्या महिला दिनापासून सुरुवात करुया,असेही श्री.राव म्हणाले.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, आपलं आयुष्य कशाप्रकारे जगायचं, कोणतं ध्येय ठरवायचं, करिअर कोणतं निवडायचं हे महिलांनी स्वत: ठरवावं, पण या निर्णयात कुटुंबातील प्रत्येकाचं मत विचारात घ्यायला हवं.
यावेळी आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रियांका सौरभ राव यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पेहराव, केशरचना, आपली देहबोली, सकारात्मक विचारसरणी कशी असावी याबाबत सादरीकरणातून माहिती दिली. डॉ. अपर्णा लेले यांनी योग्य आहार पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच परिसंवाद कार्यक्रमात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, वैमानिक पुनव गोडबोले, सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व कलाकार सायली संजीव सहभागी झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मोनिका सिंग यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली. मतदानामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून त्यासाठीच्या उपाययोजनांबाबत श्रीमती सिंग यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुकबधिर असूनही विविध पुरस्कार मिळविलेल्या प्रेरणा शहाणे- दिक्षीत यांनी गणेशवंदना सादर केली.
सूत्रसंचालन अक्षय घोळवे व स्नेहल दामले यांनी केले. यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी महिलांसाठी पैठणीचा खेळ व लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला. यामध्ये मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या. महिलांनी या कार्यक्रमांचा आनंद घेतला.



