पुणे – रेल्वे प्रवाशांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत राहून न्याय व्यवस्था व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. मोडक यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लोहमार्ग न्यायालय, पुणे मंडळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय, जिल्हा लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर रेल्वे प्रवाशांच्या अधिकार व हक्कांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर. अष्टुरकर, रेल्वे कोर्टाचे न्यायाधीश संजय सहारे, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त डी. विकास, रेल्वे पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, रेल्वे वाणिज्य प्रबंधक एस.के. दास आदी उच्च अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी विभागीय रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक श्री. मिलींद देऊस्कर आपल्या भाषणात म्हणाले की, रेल्वेच्या गेटला बरेच वाहन चालक धडक देतात. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान रेल्वेला सोसावे लागते. म्हणून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केली.
प्रवाशांनी घ्यावयाची दक्षता यावर गुन्हे गुप्त विभागाचे निरिक्षक सुनिल चाटे बोलले. रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर रेल्वे स्थानक निर्देशक ए.के. पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रवाशांच्या अधिकारांची माहिती के.एस. दास यांनी दिली तर लोकअदालतीवर अॅड. व्ही.व्ही. बारभाई यांचे भाषण झाले. भारतीय रेल्वे कायद्यातील तरतुदींची डि. विकास यांनी माहिती दिली. रेल्वे अपघात व त्यांना मिळणारी मदत यावर डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी मार्गदर्शन केले. आरोपींचे अधिकार व न्यायालयीन प्रक्रिया यावर रेल्वे न्यायधीश संजय सहारे यांनी भाषण केले. कायदेशीर मदत व मध्यस्थी यावर पी.आर. अष्टुरकर यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान प्रास्ताविकेच्या कोनशिलेचे अनावरण प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी लोकअदालतीचे महत्व सांगणाया फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना रेल्वे न्यायाधीश संजय सहारे यांनी केली तर सुत्रसंचालन न्यायाधीश स्वप्नील थोडगे यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक डॉ. अतुल झेंडे यांनी केले.