पुणे, दि. 16- राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी हे केंद्र सरकारच्या हातमागासाठी असलेल्या विपणना संबंधीच्या योजनांपैकी एक असून हे प्रदर्शन उच्च दर्जाचे आहे. या प्रदर्शनाचे आयोजन सात वर्षानंतर पुणे शहरात ए.आय.एस. एस.एम.एस. कॉलेज ग्राऊंड, रेल्वे स्टेशन मागे, आर.टी.ओ ऑफिसजवळ करण्यात आले आहे. या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनीचे आयोजन विकास आयुक्त (हातमाग), नवी दिल्ली, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळास देण्यात आलेली आहे.
हातमागावर उत्पादित मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे. विविध राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये गरीब विणकरांद्वारे उत्पादित वाजवी हातमाग कापड ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणे. हातमाग क्षेत्रामध्ये उत्पादित कापडाची व वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्सची ग्राहकांना ओळख पटवून देणे. हातमाग विणकरांमध्ये व ग्राहकांमध्ये नविनतम आधुनिक डिझाइन्स तयार केल्या जाऊ शकतात व मार्केट विषयी पडताळणी आदी बाबत माहिती उपलब्ध करून देणे, हे या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे प्रमुख उद्देश आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी 2018 ते 4 मार्च 2018 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये एकुन 14 राज्यांचे स्टॉल असून या प्रदर्शनाचे बांधकाम 45 चौ. फुट मध्ये असून केंद्र शासनाच्या थीम पॅव्हेलियन 2500 चौ. फुटाचे आहे. थीम पॅव्हेलियन मध्ये विणकाम कसे करण्यात येते, कापडावर प्रिंटींग कशी करण्यात येते याची ओळख नागरीकांना होण्याकरीता प्रात्येक्षिक दाखविण्यात येत. प्रदर्शनास प्रवेश व पार्किंग निशुल्क आहे.
महाराष्ट्र राज्यातील उत्पादीत कापड, साडी, ड्रेस मटेरिअल, पैठणी साडी, उत्तरप्रदेशची बनारसी साडी, तनचुई सिल्क साडी, सितापूर दरी, लखनवी चिकन वर्क, जम्मु काश्मिरची कश्मिना शॉल, जामा वर्क साडी, ओरिसाची संऊलपूरी टाय आणि डाय साडी, हारियानाची सिल्क बेड कव्हर, कुशन कव्हर, राज्यस्थानची जयपूरी प्रिंटेड बेडशिट, रजाई, बंधेज सूट, टॉप, दिल्लीची बेडशिट, कर्टन, बॅग्ज, पश्चिम बंगालची जमदानी साडी, मध्यप्रदेशची चंदेरी सुटपीस, बटीक साडी, माहेश्वरी साड, बाघ प्रिंट साडी, बीहारची टसर ड्रेस मटेरिअल, मुगा मटका सिल्क साडी, मधुबनी साडी, झारखंडची एम्ब्रायडी बेडशिट, टॉप, सुट, तेलंगणाची इकत साडी, मंगलगौरी साडी, कोचमपट्टी, तामीळनाडूची मदुराई, कोईमतूर,कोरा, कॉटन व सिल्क साडी, गुजरातची पटोला साडी, संस्कृती साडी, बेडशीट, टॉप्स इत्यादी विविध स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणेकरांनी राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनीस भेट देऊन कलाकुसर विणकाम करणाऱ्या विणकारांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे यांनी केले आहे.

