व्यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ आयोजित ‘हास्यदर्शन 2018’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकारांचे संमेलन 20 आणि 21 जानेवारीस ठाणे येथे संपन्न झाले. पाचपाखाडी परिसरातील ज्ञानराज सभागृहात दिवंगत व्यंगचित्रकार तसेच सध्याच्या नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली व्यंगचित्रे पहाण्याची संधी ठाणेकरांना लाभली. दोन दिवस चाललेल्या संमेलनातील सर्वच उपक्रमांना रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सर्वसामान्य माणसाला व्यंगचित्रांची ओळख असतेच तथापि ती अधिक जवळून व्हावी, त्यांच्या मनातील शंका-कुशंका दूर व्हाव्यात, व्यंगचित्रकारांना प्रत्यक्ष भेटता यावे, हा प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. देश-विदेशातील 70 हून अधिक व्यंगचित्रकारांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग होता.
पहिल्या दिवशी संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर, ठाणे मनपा परिवहन समितीचे सदस्य राजेश मोरे, नगरसेविका रुचिता मोरे, कंबाईनचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे, चारुहास पंडित, पितांबरीचे राजेश दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुहास बहुलेकरांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात कलेच्या प्रांतातील भिंती पाडून टाकण्याची गरज प्रतिपादन केली. गायनाच्या क्षेत्रातही शास्त्रीय संगीत गाणारा, भावगीत गाणारा, गजल गाणारा असे प्रकार नकोत. चित्रकलेतही हाच नियम लावावयास हवा. चित्रकार, व्यंगचित्रकार, अर्कचित्रकार असे भेद नकोत. मानवी जीवनातील गंमती-जमती बघण्याची सवय खूप कमी असल्याने धीरगंभीर वागलो तर सज्जन समजतात. गांभिर्यालाच सज्जनता मानण्याचा प्रवाह सध्या दृढ होत असल्याने समाजातील गमतीजमती बघण्याची दृष्टीच नकळत हरवत आहे. या पार्श्वभूमीवर, विनोदाच्या माध्यमातून समाजातील व्यंग दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्यंगचित्रकार करत असतो, ही बाब लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली. दुस-यांचे नुकसान न करणे हे चांगले असते तथापि, समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रवृत्ती असतात. या दोन्ही प्रवृत्ती समजावून घेऊन त्यावर भाष्य करण्याची क्षमता व्यंगचित्रात असते. पूर्वी राजाच्या दरबारी विदूषक असायचे, ते अशा प्रकारचे भाष्य करायचे. आपल्याकडे व्यंगचित्रकला अस्तित्वात असावी, पण त्याचे पुरावे नाहीत. ब्रिटीशांच्या काळात भारतीय कलेकडे अधिक लक्ष दिले गेल्याचे त्यांनी सांगितले. मराठी व्यंगचित्रकारांची माहिती असणारे पुस्तक प्रकाशित होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली. व्यंगचित्रकारांच्या कार्यक्रमात पुस्तक भेट न देता, संबंधित पाहुण्यांचे व्यंगचित्र काढून भेट दिल्यास ती अविस्मरणीय आठवण राहील, सांभाळून ठेवल्या जाईल, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी नर्मविनोदी शैलीत आपले मनोगत मांडले. ते म्हणाले, व्यंगचित्राशी माझा पहाण्यापलिकडे संबंध नाही. लहानपणी माझे वागणे पाहून घरातील मंडळींनी मला ‘कार्टून’ ही उपाधि दिली. 1959 मध्ये सुधा करमरकर दिग्दर्शीत नाटकांत मला काम मिळाले, याचे लेखक रत्नाकर मतकरी होते तर वेशभूषा रघुवीर तळाशीलकर यांनी केली होती. त्यातील वेशभूषा आणि अभिनय कार्टून पध्दतीने करावयाचा होता. माझे काम चांगले झाल्याचे समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णींनी लिहीले होते. समाजातील दोष न बोलता चित्रातून दाखवण्याचे काम व्यंगचित्र करते. व्यंगचित्रकला ही हसवणारी कला आहे, पूर्वी नट सहसा दिसत नसत, आज दोन घरामागे नट असतो. नाटक, एकांकिका, मालिकांमध्ये कामे करतात. पण समाजात व्यंगचित्रकार दिसत नाहीत. त्यांची संख्या कमी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संमेलनात अमोल ठाकूर यांच्या कडून स्वतःचे व्यंगचित्र रेखाटून घेताना पहिल्यांदाच मॉडेलिंग या नव्या क्षेत्राचा परिचय झाल्याचे त्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. मला जेव्हा नैराश्य आल्यासारखे वाटते तेव्हा ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकाची कॅसेट लावतो. त्यामध्ये राजा गोसावी अभिनेते आहेत, नाटक पहातांना मनमुराद हसायला येते आणि नैराश्य जाते, असेही त्यांनी आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले.
कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित यांनी व्यंगचित्रकार संमेलनाचा इतिहास सांगितला. दादर येथील संमेलनात शि.द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना तर नागपूर येथील संमेलनात मनोहर सप्रे यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला होता. राजेश मोरे यांनी व्यंगचित्र कलेला उर्जितावस्था यावी, या हेतूने आयोजनात सहभाग घेतल्याचे सांगितले. विश्वास दामले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कंबाईनचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे यांनी संमेलनाचा हेतू विशद केला. ते म्हणाले, मराठी व्यंगचित्रकारांचे नाव जगभरात व्हावे, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी ‘कार्टूनिस्ट कंबाईन’ असे संस्थेचे नामकरण केले. परदेशाच्या तुलनेत भारतात कमी व्यंगचित्रकार आहेत. सर्वसामान्य माणसाला व्यंगचित्रकलेची ओळख व्हावी, या हेतूने शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार जाऊन कार्यशाळा घेणार आहेत. यात प्रामुख्याने शाळा मुख्याध्यापक आणि कला शिक्षक यांच्याशी संवाद साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिकाप्रमाणेच समाजातील दोष दाखविण्याचे काम व्यंगचित्रकार करत असूनही त्यांना साहित्यिक मानले जात नाही, अशी खंत व्यक्त करुन दैनिकाशिवाय फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटर सारख्या समाजमाध्यमांचा वापर करून व्यंगचित्रकारांनी लोकजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. व्यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. परंतु हे संमेलन कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, संमेलनात उपस्थित राहणारे सर्व राजकीय नेते केवळ कलारसिक म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी संमेलनाचा लोगो तयार केला असून 400 हून अधिक व्यंगचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. कार्टूनिस्ट कंबाईनने यापूर्वी नांदेड, दादर, नागपूर येथे संमेलन आयोजित केले होते. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. आताही लोकसहभाग सकारात्मक असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. व्यंगचित्रकलेला गती मिळावी, यासाठी नियमितपणे उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी तर आभारप्रदर्शन अरविंद गाडेकर यांनी केले. त्यानंतर व्यंगचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
दुपारी ज्ञानराज सभागृहातच महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी व्यंगचित्र कार्यशाळा घेण्यात आली. वैजनाथ दुलंगे आणि राधा गावडे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी कचराळी उद्यानात व्यंगचित्रकारांनी प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये वैजनाथ दुलंगे, अरविंद गाडेकर, सुरेश क्षीरसागर, विवेक प्रभुकेळुस्कर, संजय मोरे, उमेश चारोळे, भटू बागले, विनय चाणेकर, ज्ञानेश बेलेकर, प्रकाश घादगिने यांनी सहभाग घेतला.
शेवटच्या सत्रात परिसंवाद झाला. विषय होता ‘सोशल मिडीया आणि व्यंगचित्रांचे सामर्थ्य’. यामध्ये पत्रकार नंदकुमार टेणी, चित्रकार विजय बोधनकर, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित, गणेश जोशी, महेंद्र भावसार आणि संपादक कैलास महापदी यांनी भाग घेतला. नंदकुमार टेणी यांनी व्यंगचित्रांचा दर्जा घसरत चालल्याचे निरीक्षण नोंदविले. व्यंगचित्राची रेषा सुखावह असली, त्यात गोडवा असेल तर व्यंगचित्राला ग्रेस येते. व्यंगचित्रकारांनी वाचन वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चित्रकार बोधनकर यांनी गृहिणी भाजीमध्ये जितके मीठ टाकते, तितकाच सोशल मिडीयाचा वापर असावा, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, मी एक कविता लिहीली, ती व्हॉट्सअप वर पाठविली, पाचच मिनिटांत कवितेखालील माझे नाव बदलून दुस-याकडून मला आली. एखाद्याचे वडील वारले तर त्या पोस्टलाही लाईक येते, तुम्हाला बरे वाटावे म्हणून न वाचताच पोस्ट लाईक करणा-यांचीही संख्या कमी नाही, हे सोशल मिडीयाचे वास्तव त्यांनी लक्षात आणून दिले. सराव आणि वाचनामुळे अज्ञान जेवढे बाहेर येते, तेवढी जागा ज्ञानाने भरुन येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
संपादक महापदी यांनी प्रिंट मिडीयाचे महत्त्व आजही अबाधित असल्याचे अभिमानाने सांगितले. सोशल मिडीयाची कितीही मोठी इमारत उभी राहिली तरी त्यांची मूळं प्रिंट मिडीयातच आहेत. व्यंगचित्रकारांनी आपला दर्जा सुधारला पाहिजे. बातमी पिळायची असते म्हणजे जसे ओला कपडा पिळून त्यातील पाणी काढून टाकले जाते तसेच बातमीमध्ये शब्दांचा फापटपसारा नको असतो. व्यंगचित्र ही तसेच हवे, असे ते म्हणाले. व्यंगचित्रकार कुलकर्णी यांनी सोशल मिडीया हे एक चांगले व्यासपीठ असल्याचे सांगितले. दैनिके, साप्ताहिके यामध्ये प्रत्येकाला संधी मिळेलच असे नाही, अशा व्यंगचित्रकारांना फेसबुक, व्हॉट्सअपमुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. मला मधुकर पाटकर, निखील वागळे यासारखे संपादक लाभले, सोशल मिडीयात असे संपादक लाभत नाहीत, अशी उणीवही त्यांनी लक्षात आणून दिली. व्यंगचित्रकार हा दंगली व्हाव्यात, तेढ निर्माण व्हावी म्हणून व्यंगचित्र रेखाटत नाही, तथापि व्यंगचित्रकारांनी सेल्फ सेन्सॉरशिपची जाणीव ठेवावी. अशी जाणीव ठेवली तर सोशल मिडीयासारखा पर्याय नाही, असे ते म्हणाले. गणेश जोशींनी वृत्तपत्र ते सोशल मिडीयातील आपल्या व्यंगचित्रकलेचा प्रवास सांगितला. व्यंगचित्रांत कोणते रंग वापरावे, यासाठीही कार्यकर्त्याकडून सूचना येत असल्याचे ते म्हणाले. चारुहास पंडित यांनी स्वत:चा दर्जा ओळखून, वाचक ओळखून व्यंगचित्र रेखाटले तर सोशल मिडीयाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकता, असे सांगितले. व्यंगचित्रांना वृत्तपत्रांकडून संधी मिळत नसल्याचे मत नोंदवत व्यंगचित्रकारांनी स्वत:ला अपग्रेड केले पाहिजे. सोशल मिडीयाचा तंत्रशुध्द वापर करुन आर्थिक उपयोग कसा करता येईल, ही शिकले पाहिजे, असे सांगितले. महेंद्र भावसार यांनी व्यंगचित्रांत व्यासंगता आणि सखोलता आली पाहिजे, असे सांगून स्वयंमुल्यमापनाची गरज प्रतिपादन केली. आज फेसबुक, व्हॉट्सअप या सामाजिक माध्यमांची चलती आहे. भविष्यात दुसरे एखादे माध्यम झपाट्याने येऊ शकते. तेही माध्यम आत्मसात करता आले पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे व्यंगचित्रकारांनी स्वत:ला घडवले पाहिजे, असे ते म्हणाले.
रात्री ज्ञानराज सभागृहात मनोरंजनाचा व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. मराठी मातीत जन्मलेले, वाढलेले ‘मायबोली’ या इस्रायलमधल्या मराठी ज्यू बांधवांच्या त्रैमासिकाचे संपादक नोहा मस्सील व त्यांच्या पत्नी सीबीया यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. नोहा मस्सील इस्रायल मध्ये स्थायिक झाले आहेत. पण मायमराठीला विसरलेले नाहीत. आपण मात्र महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाही, याची जाणीव सर्व उपस्थितांना झाली. डॅनियल सॅम्युअल यांनी एकपात्री कार्यक्रम सादर करुन मनोरंजन केले.
21 जानेवारीस सकाळी कचराळी उद्यानात सर्व वयोगटांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी लहान मुले, पालक व त्यांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यंगचित्रकार गणेश जोशी, वैजनाथ दुलंगे, विवेक मेहेत्रे, विवेक प्रभुकेळूस्कर, नागराज गरड यांनी मानवी आकृती, मानवी भावभावना, पक्षी, प्राणी यांच्या चित्रांची प्रात्यक्षिके सादर केली. या सादरीकरणात त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले.
दुपारच्या पहिल्या सत्रात उपस्थित असलेल्या व्यंगचित्रकारांचा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाबूजी गंजेवार, विश्वास सूर्यवंशी, गणेश काटकर, रवींद्र बाळापुरे, किशोर शितोळे, सुहास पालीमकर, धनराज गरड, दिनेश धनगव्हाळ, अतुल पुरंदरे, वैजनाथ दुलंगे, अनंत दराडे, सतीश उपाध्याय, उमेश चारोळे, संजय मोरे, अरविंद गाडेकर, जी. ए. बारसकर, विनोद गोंगे, घनश्याम देशमुख, योगेंद्र भगत, चारुहास पंडित, विनय चाणेकर, अरविंद देशपांडे, सुरेश राऊत, सिध्देश देवधर, अशोक सुतार, ज्ञानेश बेलेकर, लहू काळे, नीलेश जाधव, गौरव यादव, विवेक प्रभूकेळुस्कर, अमोल ठाकूर, महेंद्र भावसार, विवेक मेहेत्रे, प्रशांत कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, जगदीश कुंटे, राधा गावडे, शरयू फरकांडे यांचा समावेश होता. याच संमेलनात राजेंद्र सरग यांचा सन 2017 मध्ये व्यंगचित्र क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सरग यांना देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता पुरस्कार आणि दिवाळी अंकांच्या संपादकांचा ‘दिवा पुरस्कार’ गेल्या वर्षी प्राप्त झाला. तसेच 2017 मध्ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्ये त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे प्रकाशित झाली. याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनात हा गौरव करण्यात आला. व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनाही विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले. याशिवाय संमेलनाच्या निमित्ताने नवोदितांसाठी व्यंगचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये अजित गौड, सुधीर पगारे, किशन गुप्ता, राई राणे, एन. धीरजा, आर्य प्रभूकेळुस्कर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, दिल्ली, काश्मीरसह महाराष्ट्रातील नवोदित व्यंगचित्रकारांनी भागघेतला होता.
दुस-या सत्रात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच ‘हास्यविवेक’ आणि ‘आक्रोश’ या दोन पुस्तकांचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात दिवाळी अंक आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर, आक्रोशचे ज्ञानेश्वर उर्फ तात्यासाहेब जराड, उद्वेलीच्या वैशाली मेहेत्रे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करतांना ठाकरे म्हणाले, मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना मी परवडणार नाही, म्हणूनच फेसबुक पेज सुरु केले आणि त्यावर मी काढलेली व्यंगचित्र टाकतो. तुम्हीही सोशल मीडियावर व्यंगचित्रे टाकावी. पत्रकार, साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मानधन नसल्याने व्यंगचित्रकारांना कलादालनांमध्ये प्रदर्शनेही भरविता येत नाहीत, त्यामुळे बहुतांश व्यंगचित्रकारांनी सोशल साइट्सची मदत घेतल्याचे विवेक मेहेत्रे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात व्यंगचित्रकलेचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. शि.द.फडणीस म्हणाले, व्यंगचित्ररेषा ही तीव्र नि वेगवान असते. तरुणांनी या कलेमध्ये रुची घ्यावी. एकदा अर्कचित्राची भाषा उमजल्यावर व्यंगचित्रकार म्हणून साऱ्या वाटा मोकळ्या होतात, असे ते म्हणाले.
सायंकाळच्या सत्रात ‘आमच्यासारखे आम्हीच’ ही व्यंगचित्रकारांसाठी आव्हानात्मक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऐनवेळी विषय देऊन अर्कचित्र, व्यंगचित्रे काढण्यास सांगण्यात आली. यामध्ये सतीश उपाध्याय, संजय मोरे, उमेश चारोळे यांची टीम विजयी ठरली. अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, अशोक सुतार यांना द्वितीय तर विवेक प्रभूकेळुस्कर, अमोल ठाकूर, वैजनाथ दुलंगे यांना तृतीय पुरस्कार प्राप्त झाला.
शेवटच्या सत्रात ‘मराठी दैनिकांचे संपादक राजकीय व्यंगचित्रांपासून दूर का?’ या विषयावरील परिसंवाद झाला. यामध्ये व्यंगचित्रकार सुरेश लोटलीकर, बाबू गंजेवार, पत्रकार भाऊ तोरसेकर, पंढरीनाथ सावंत सहभागी झाले होते.
लोटलीकर यांनी परदेशातही राज्कीय व्यंगचित्रे छापण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगून याबाबत गंभीरपणे विचार होण्याची गरज मांडली. बाबू गंजेवार म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे गुदगुल्या करणारी, तर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे गालगुच्चे घेणारी होती. जातीयतेचे विष पसरलेले काही समाजगट व्यंगचित्रकारविरोधी आंदोलन करतात, अशा वेळी समाज व्यंगचित्रकाराच्या पाठीशी उभा राहत नाही, ही बाबही व्यंगचित्रकारांच्या पिछेहाटीला जबाबदार आहे असल्याचे मत मांडले.
पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आपली परखड मते मांडली. विशिष्ट अजेंडा घेऊन काम केले तर त्रास होणारच, असे नमूद करुन ते म्हणाले, जोपर्यंत व्यंगचित्र, काव्य, पत्रकारिता लोकांसाठी आहे, लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. पंढरीनाथ सावंत यांनी व्यंगचित्रकाराने आपले चित्र सर्वोत्कृष्ट कसे राहील याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. व्यंगचित्र सुचले म्हणून काढले असे होता कामा नये, व्यंगचित्रकारांनी निरीक्षण, मेहनत करायला हवी, असे ते म्हणाले. प्रशांत कुलकर्णी यांनी समारोप करतांना व्यंगचित्रकारांनी आपली निष्ठा व्यंगचित्रकलेशी ठेवायला हवी, असे सांगून ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या शैलीचाही अभ्यास केला गेला पाहिजे, असे सांगितले.
या प्रदर्शनास अनेक कलारसिक, मान्यवरांनी भेटी दिल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही व्यंगचित्रांचा आनंद घेतला. ठाणे महापालिकेतर्फे व्यंगचित्रस्पर्धा आयोजित केली जाईल, असे पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले. अमोल ठाकूर आणि संजय मोरे यांनी एकाचवेळी उत्सफूर्तपणे त्यांचे अर्कचित्र रेखाटले.
मराठीतील ‘हिंदूपंच’ हे व्यंगचित्र नियतकालिक ठाणे नगरीत सुमारे दीड शतकापूर्वी प्रकाशित झाले होते. त्याच ठाण्यात व्यंगचित्रकार संमेलन आयोजित करण्यात आले होते, हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. नामवंत व्यंगचित्रकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी, त्यांच्या व्यंगचित्रांचा आनंद, विविध विषयावरील परिसंवाद, व्यंगचित्र कार्यशाळा, मार्गदर्शन, ‘तुमचे व्यंगचित्र तुमच्यासमोर’ हा धमाल अनुभव रसिकांच्या दीर्घकाळ नक्कीच स्मरणात राहील.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे (भ्रमणध्वनी 9423245456)