पुणे- उद्योगांना चालना देण्यासाठी व उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी
तात्काळ उपाययोजन कराव्या, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली. जिल्हा उद्योगमित्र
समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना
केली.
श्री. काळे म्हणाले, चाकण औद्योगिक परिसरातील वाढत्या लोकसंख्येची गरज व गुन्हेगारी लक्षात
घेवून कामगारांच्या सूरक्षेसाठी या परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती होण्यासाठी पाठपूरावा करावा.
कामगारांसाठी आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक ठिकाणी इ.एस.आय रुग्णालय बांधण्याबाबत कार्यवाही
करावी. कामगारांच्या सोयीसाठी पिंपरी- चिंचवड औद्योगिक वसाहती अंतर्गत कंपन्यांच्या शिफ्ट सुरु व बंद
होण्याच्या वेळी पी. एम. पी. एम. एल. च्या बसची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर
या मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी या रस्त्याचा विकास त्वरीत करावा असे सांगून
राज्य कामगार विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व पोलीस यंत्रणा यांनी माथाडी कायद्याचा
गैरवापर करणाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, असे निर्देशही श्री. काळे यांनी दिले.
यावेळी हिंजवडी औद्योगिक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये
आग्निशमन केंद्र उभारणे, औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक-टेम्पो टार्मिनल उभारणे, पार्किंग व्यवस्था, सांडपाणी
व्यवस्थापन, कर आकारणी या बाबींवर तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. या बैठकीला पोलीस,
कामगार विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महानगरपालिका व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी व अशासकीय
सदस्य उपस्थित होते.