पुणे– ग्राहक म्हणून असलेला आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ग्राहकाने जागृक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी आज केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आज शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री.भालेदार बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक आर.डी.शेलोत, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे, नायब तहसिलदार उत्तम बडे, महाराष्ट्र राज्य दर नियंत्रक समितीचे सदस्य रमेश टाकळकर, हिंदूस्थान पेट्रोलिअम कंपनीच्या श्रीमती अनघा गद्रे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अरुण वाघमारे, तुषार झेंडे, ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष विलास लेले आदी उपस्थित होते.
श्री.भालेदार म्हणाले, आपण सगळेच ग्राहक आहोत. आपण विविध जीवनावश्यक वस्तू खरेदी करत असतो. आपणाला प्रत्येक पदोपदी अडचणीला सामोरे जावे लागते. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती ग्राहक संरक्षण कायदयाच्या माध्यमातून मिळत असते ती जाणून घेतली पाहिजे. डिजीटल मार्केट, इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या माध्यमातूनही ग्राहकाला आपल्या अडचणी सोडविता येतात. प्रत्येक ग्राहकाला विनामुल्य ग्राहक पंचायतीकडे तक्रार करता येते. ग्राहकांनी ग्राहक संरक्षण, दक्षता समिती यांचीही मदत घ्यावी. ग्राहक हाच केंद्र बिंदु असून प्रत्येकाने चांगली सेवा देण्याची खुणगाठ बांधली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही ग्राहकांच्या तक्रारीबाबत पाठपुरावा केला जाईल. असेही ते म्हणाले.
श्री.वाघमारे म्हणाले, ग्राहकाने प्रशासनाशी सुसंवाद साधला पाहिजे. ग्राहक संरक्षण कायदा हा सर्वांच्या उपयोगासाठी आहे. प्रशासन आणि ग्राहक यांनी हातात हात घेवून काम केले पाहिजे. प्रशासनाच्या माध्यमातून चांगली सेवा होत असते. यावेळी विलास लेले, तुषार झेंडे, रमेश टाकळकर, श्रीमती अनघा गद्रे यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ, वैध मापनशास्त्र यंत्रणा, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, हिन्दुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन इत्यादी विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने लोकराज्य मासिकांचा स्टॉल उभारण्यात आला होता. या सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांनी केले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

