पुणे: बेकायदेशीर वाहनाबाबत व वाहतूकीबाबत कारवाईची धडक मोहिम राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, नियमांचे पालन झाले पाहिजे. प्रवाशांची फसवणूक होवू नये तसेच रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे यासाठी पुढील बैठक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मागील बैठकीत अशासकीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. यामध्ये पुणे नगर रोडवर वाघोली ते शिरुर दरम्यान बेकायदेशीर कट मारले आहेत. यामुळे अपघात होत आहेत, याविषयी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांमार्फत यावषियी वस्तुस्थिती अहवाल मागवून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच दौंड तालुक्यात आधार कार्ड करण्यासाठी मशिन उपलब्धतेबाबत मागणी होती. याबाबत सोयीच्या ठिकाणी मशिन उपलब्ध करुन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात शुध्द मिनरल वॉटर टँकरवर बेकायदेशीर पाणी विकले जात असल्याची तक्रार होती. याबाबत अन्न, औषध प्रशासन व वजनमापे यांनी दिवस ठरवून संयुक्तपणे तपासण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
तसेच याबाबत विविध अशासकीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याप्रमाणे यापुढील बैठकीत ज्या विभागांशी संबंधित विषय आहेत त्यांनी अहवाल दिला असला तरी बैठकीला उपस्थित राहावे. सर्व जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविले जाणार असल्याचे सांगितले.