पुणे : येत्या 14 नोव्हेबर रोजीच्या कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या यात्रा सोहळयात मोठया प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. या यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिल्या.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथील कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयाची पुर्व तयारी बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव पुढे म्हणाले की, श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयासाठी खेडच्या उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष (नियंत्रण)स्थापन करावे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करावी. तसेच वारकऱ्यांसाठी सरकारी दरात रॉकेल, गॅस, धान्य उपलब्ध करुन दयावे. आळंदी येथे पाहणी करुन इतरही अडचणीची दखल घ्यावी. तेथील अतिक्रमण काढावे. यात्रा कालावधीत मांसमच्छी व दारु विक्री यावर बंदी घालावी. आळंदी नगरपरिषदेने तिर्थक्षेत्रातील प्रमुख भागामध्ये (प्रदक्षिणा रोड, गोपाळपुरा, इंद्रायणी घाट) येथे विद्युत व्यवस्था करावी. पालखी तळावरील स्वच्छता व सपाटीकरण करण्यात यावे. रस्त्यावरील, गटारावरील चेंबरवरील पत्रे काढुन चेंबर झाकणेचे योग्य नियोजन करावे. तात्पुरती शौचालये उभारणे, आरोग्याच्या दृष्टीने यात्रेच्या ठिकाणी औषधांची धुर फवारणी करावी. आळंदी येथील रस्ते दुरुस्त करणे, उघडी गटारे बंद करणे, आळंदी येथील नियंत्रण कक्षात तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. तसेच भाविकांची सुरक्षितता विचारात घेऊन आळंदी यात्रेच्या ठिकाणी पथारी वाले विक्रेते, खेळणी विक्रेत याबाबतचे नियोजन करणे.
पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्त तैनात करणे. आळंदी येथे येणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे. स्पीकरचा आवाज मार्यादीत ठेवणे विषयी दक्षता घ्यावी. तसेच ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिकासह सुसज्ज डॉक्टर व मेडीसिन, ओ.पी.डी. व आय.पी.डी.ची तात्काळ व्यवस्था करावी. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने नियमित पाणी पुरवठा करावा. श्री क्षेत्र आळंदी येथे अग्निशामक बंब याची सोय करावी. एस.टी.महामंडळाने शासकीय विश्रामगृहाजवळ यात्रा काळात तात्पुरते एस.टी.स्टॅण्ड उभारावे.देहुफाटा चौकाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करावी. यात्रा कालावधीत जादा बसेसची व्यवस्था करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने जड वाहने प्रवेशास प्रतिबंध करावा.तसेच जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीत दोन दिवस आधी पाणी सोडावे. भारत संचार विभागाने मोबाईल कनेक्टीव्हीटी कॅपॅसिटी वाढवावी. विद्युत विभागाने दि.9 ते 18 नोव्हेंबर कालावधीत अखंडीत वीज पुरवठा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्ते व्यवस्थित करावे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

