पुणे, – वाहनांमुळे शहरातील वाढते हवा प्रदुषण व त्याच्ये दुष्परिणाम लक्षात घेऊन अमोल चाफेकर यांनी हवा प्रदुषण नियंत्रकाचा शोध लावला आहे. या प्रदुषण नियंत्रकाचे कर्वेरोड येथील नळ स्टॉप चौकात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे आणि स्ट्राटा ग्रुपचे अध्यक्ष अमोल चाफेकर, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल अध्यक्ष उद्य कुलकर्णी उपस्थित होते. तसेच महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना बापट म्हणाले की, दिवसें दिवस होणारी प्रदुषणातील वाढ ही चिंतेची बाब असून, या स्थितीचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा, वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषण नियंत्रणासाठी प्रदुषण नियंत्रक बसविणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या नविन तंत्रज्ञानाचाही उपयोग मोठ्या प्रमाणात व्हायला हवा. चाफेकर यांनी प्रदुषणाचे गांभीर्य ओळखून त्यावर उपाय शोधला आहे, प्रदुषणाच्या दुष्परीणामांपासून वाचण्यासाठी या नियंत्रकाचा जनतेला फायदा होईल. तसेच हे नियंत्रक सर्व ठिकाणी बसविण्यासाठी सरकारी संस्थेबरोबर खाजगी व सामाजिक संस्थेनी सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण व अंकुश ठेवण्यासाठी या प्रदुषण नियंत्रकाचा उपयोग होईल. या नियंत्रकामध्ये अशुध्द हवा शोषून त्या हवेचे शुध्दीकरण केले जाते आणि शुध्द हवा परत बाहेर सोडली जाते. हे नियंत्रक रहदारीच्या ठिकाणी बसविण्यात येईल. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदुषण नियंत्रक बनविण्यात आले असून त्याचे पेटंट अजून प्रलंबित आहे, अशी माहिती चाफेकर यांनी दिली.
दुचाकी व सार्वजनिक वाहतुक मधून प्रवास करणाऱ्या लोकांना हवा प्रदुषणाचा जास्त त्रास होतो. हे नियंत्रक रेल्वे स्टॅण्ड, बसस्टॅण्ड, टोल नाका अशा वाहतुकीच्या ठिकाणी बसवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा नागरीकांना होईल, असेही ते म्हणाले.
हवा प्रदुषण नियंत्रका मधून एका वेळी 2000 सीएफएम(क्युबीक फीट पर मिनिट) एवढी शुध्द हवा दर मिनिटाला बाहेर टाकल्या जाते. यामुळे हवा प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर काही प्रमाणात आळा घालता येईल.
जनतेच्या फायद्यासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या नियंत्रकाच्या चार युनिट पैकी एक युनिट रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल तर्फे तर उर्वरित तीन युनिट स्ट्राटा ग्रुप कडून पुरस्कृत करण्यात आले आहे.


