पुणे, दि. 27 : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी म्हणजे दि. 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबरच सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिले.
राष्ट्रीय एकता दिन आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीला संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित एकता दौड दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पुण्यातील विधानभवन येथे सुरु होवून पुन्हा याच ठिकाणी संपेल. साधारणपणे दोन किलोमीटर अंतराची ही दौड असेल. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी शाळांचे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटना व क्रीडा मंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. काळे यांनी केले आहे. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा तसेच परेड आयोजित करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्थांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस शपथ देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.