पुणे- ‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’ या अखिल भारतीय व्यंगचित्रकारांच्या संघटनेच्यावतीने नाशिक येथे ‘हास्यदीपावली 2017’ हे व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. दिनांक 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर असे तीन दिवस हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहील.
आजपर्यंत पुणे, नांदेड, नागपूर, मुंबई अशा ठिकाणी संमेलने व अनेक ठिकाणी व्यंगचित्र प्रदर्शने झाली आहेत. नाशिक येथे संस्थेचे हे पहिलेच व्यंगचित्र प्रदर्शनआहे. ‘हास्यदीपावली 2017’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विवेक मेहेत्रे, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, घनश्याम देशमुख, विनय चानेकर, रवींद्र बाळापुरे, अनंत दराडे, अवि जाधव, भटू बागले, दिनेश धनगव्हाळ, अरविंद गाडेकर, राजेंद्र सरग व इतर व्यंगचित्रकार उपस्थित असतील. तब्बल 50 व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे, 25हून अधिक व्यंगचित्रकारांचा प्रत्यक्ष सहभाग, नामवंत व्यंगचित्रकारांची भाषणे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन असा हा तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आहे. रसिकांना या व्यंगचित्रकाराबरोबर संवाद साधता येईल.
‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’ हे अखिल भारतीय व्यंगचित्रकारांचे व्यासपीठ आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून व प्रभाकर ठोकळ, शि. द. फडणीस, वसंत सरवटे, श्याम जोशी, प्रभाकर झळके यांसारख्या मान्यवर व्यंगचित्रकारांच्या उपस्थितीत व्यंगचित्रकलेच्या संवर्धनासाठी या संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही कार्यरत असलेले विविध तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार या संस्थेचे सदस्यआहेत.