पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा गुरुवर्य पुरस्कार रामदासजी आठवले यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात आला .
बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांपैकी रामदास आठवले आहेत, जे चमकले आणि टिकले.
हा पुरस्कार म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तीचा गौरव असून, दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी हक्काने लढणारा कार्यकर्ता ते सामाजिक न्याय मंत्री असा रामदासजी आठवले यांचा प्रवास थक्क करणारा आहे, असे कौतुकोद्गार यावेळी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी काढले.
आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या नावाने जो पुरस्कार रामदास आठवले यांना दिला जात आहे, त्यामागचा हेतू हा ते ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून दलितांसाठी कार्य करत आहेत म्हणून त्यांना प्रेरणा देणे हा आहे.वस्ताद लहुजी साळवे यांनी तालमीच्या माध्यमातून मोठे कार्य केले आहे. तसेच स्वातंत्र्याची मागणी करत असताना समाजसुधारणेसाठीही कार्य केले आहे. मोठ्या उंचीच्या नेत्याच्या नावाने आठवले यांना हा पुरस्कार मिळत आहे हा खूप मोठा सन्मान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका राजश्री काळे,स्वाती लोखंडे, जेष्ठ विचारवंत काकासाहेब खंबाळकर शिक्षणतज्ज्ञ एम. डी. शेवाळे,संयोजक हनुमंत साठे, महेंद्र कांबळे,शरद गायकवाड़, आदी मान्यवर उपस्थित होते.