पुणे दि. 29: पुणे परिसरातील दिव्यांग नागरिकांसाठी पुणे येथे विकलांग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.यासाठी अपंग कल्याण आयुक्त कार्यालय,पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,स्वयंसेवी संस्था अपंग कल्याणकारी संस्था यांच्या सहकार्याने पुणे परिसरातील पात्र दिव्यांग व्यक्तींची अद्यावत यादी बनविण्याचे काम चालू आहे. यादी बनवताना एकही पात्र व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी अशा सूचना खा.अनिल शिरोळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विकलांग शिबिराच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळसकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय देशमुख, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज कल्याण विभाग तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.