केसरी वाडा येथे संवादपर्व कार्यक्रम संपन्न
पुणे, दि. 29 : अवयदानामुळे मृत्युनंतरही अवयव स्वरुपात जीवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे सामाजिक जाणिवेतून नागरिकांनी अवयवदान करावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी आज येथे केले.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत केसरी वाडा सार्वजनिक गणपती मंडळ येथे संवादपर्व कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर मुक्ता टिळक बोलत होत्या. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषधशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.संगिता शेळके, डॉ. अमृता उंचेकर, माहिती अधिकारी वृषाली पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यावेळी उपस्थित होते.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, अवयवदानामुळे मृत्युनंतर अवयव स्वरुपात जीवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. समाजात अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक गरजूंना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. संवादपर्व कार्यक्रमाद्वारे अवयवदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. अशा उपक्रमांमुळे अवयवदानाबद्दल जनजागृती होण्यास मदत होणार आहे. अवयवदानासाठी सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषधशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.संगिता शेळके यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाची माहिती देऊन अवयवदान मोहिमेला चळवळीचे स्वरुप द्यावे, असे आवाहन केले. अवयवदानाचे स्वरुप, अवयवदानाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया तसेच अवयवदानाबद्दल समज-गैरसमज याबाबत डॉ. शेळके यांनी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले. मानवाचे शरीर अनमोल असून, एका मृतदेहापासून अनेक व्यक्तींना जीवदान देता येते व त्यांचे आयुष्य सुकर बनू शकते, यासाठी देहदान ही काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. अवयवदानाबाबत उपास्थितांच्या शंकांचे निरसनही श्रीमती शेळके यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले तर आभार जयंत कर्पे यांनी मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.