पुणे: जैव ऊर्जा क्षेत्रात देशाचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून येत्या काही काळात जैव ऊर्जा क्षेत्रात भारत जगाला मार्गदर्शन करेल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या वतीने बालेवाडी, पुणे येथे दि.7 व 8 जुलै रोजी “ऊर्जा उत्सव” कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.प्रधान बोलत होते. यावेळी केंद्रीय ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्री पियुष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार सर्वश्री अनिल शिरोळे, संजय काकडे, अमर साबळे, वंदना चव्हाण, आमदार सर्वश्री माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.प्रधान म्हणाले, ऊर्जा सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असून यासाठी केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच ऊर्जा विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. जैव ऊर्जा सर्वांना परवडण्यासारखी असल्यामुळे या ऊर्जेच्या वापरावर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. इंधन व वीज सर्वांना स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याचा केंद्र सरकारचा मानस असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जैव ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
पियुष गोयल म्हणाले, शेतकरी हा देशाचा प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलचा वापर कमी होऊन प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल. परदेशात काही ठिकाणी इथेनॉलवरील गाडया वापरात आहेत. हा प्रयोग आपल्या देशात झाल्यास इंधनाची आयात कमी होण्यास मदत होईल. यासाठी इथेनॉलची निर्मिती वाढविण्यासाठी व इथेनॉल वापराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताने जगाचे नेतृत्व करावे, असे सांगून ते म्हणाले, टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा बनविण्याचे प्रयोग झाल्यास गोरगरिबांना स्वस्त दरात इंधन मिळेल. आगामी काळात गरजुंना स्वस्त दरात इंधन मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही श्री.गोयल म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या विकासासाठी गावे समृध्द होणे आवश्यक आहे. गावांचा विकास होण्यासाठी शेतीबरोबरच शेतीवर आधारीत जोडधंद्यावर भर देणे आवश्यक आहे. शेतमालातून होणाऱ्या फायदयापेक्षा शेतमालाच्या टाकाऊ पदार्थांपासून इंधन निर्मिती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी धान्याचा पाला-पाचोळा, ऊसाची चिपाडे अशा टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा निर्मितीवर भर देणारा जोडधंदा करावा. केंद्र शासनानेही याबाबत विचार करुन महाराष्ट्रात जैव ऊर्जा प्रकल्प राबविल्यास त्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल.
केंद्र शासनातर्फे पुण्यात होत असलेल्या ऊर्जा उत्सव उपक्रमाप्रमाणेच अन्य ठिकाणीही असे उपक्रम व्हावेत. अशा उपक्रमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना जैव ऊर्जा निर्मिती व वापराबाबत सविस्तर माहिती दिली जावी, जेणेकरुन जैव ऊर्जा क्षेत्राबाबत सर्वांना माहिती होईल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक् वायू विभागाचे सहसचिव संदीप पौंड्रीक तसेच बायोफयुअलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष वाय.बी. रामकृष्ण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जैव ऊर्जा विषयावर आयोजित केलेल्या चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यक्रम स्थळी जैव ऊर्जेबाबत माहिती देणाऱ्या साधनांच्या विविध स्टॉल्सच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच जैव इंधनावरील गाडयांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले. यावेळी इंडियन ऑइल कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंग, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अध्यक्ष एम.के.सुराणा, भारत पेट्रालियमचे अध्यक्ष राजकुमार, देशाच्या विविध भागातून आलेले जैव ऊर्जा क्षेत्रात काम करणारे तज्ञ, संशोधक, उद्योजक, अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.