पुणे : बातमीचा समाजावर नकारात्मक परिणाम पडणार असेल तर अशा बातमीला किती स्थान द्यायचे व सकारात्मक बातम्यांना अधिक स्थान देता येईल का, हे पत्रकारांनी ठरवले पाहिजे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे व्यक्त केले.
विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी श्री.दळवी यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख संजय तांबट, प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की, स्वर्गीय गोविंदराव तळवळकरांसारखे व्यासंगी पत्रकार आपले आदर्श असायला हवेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही प्रामाणिकपणाची, तत्वांची गरज आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्री. दळवी यांना सहकार चळवळीच्या बाबतीत प्रश्न विचारले असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले की, आजचे युग माध्यमांनी व्यापले आहे. माध्यमांमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. प्रशासनालाही अनेक प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी माध्यमांचा उपयोग व दबाव असतो. कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच माध्यम क्षेत्रामध्येही भारावून जाऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आल्हाद गोडबोले म्हणाले की, पत्रकाराचे कुतूहल कायम जागे असले पाहिजे. बातमी आणि मते यातील सीमारेषा धूसर झालेली आजची पत्रकारिता आहे. बातमीमध्ये वैयक्तिक मते वाढली आहेत. वर्तमानपत्र हे विश्वासार्हतेच्या निकषावर चालते, ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे. न पोहोचणारी माहिती मिळविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करायला पाहिजेत असेही ते म्हणाले.
उपसंचालक (माहिती) मोहन राठोड व प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मान्यवरांना रोप व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गरवारे महाविद्यालय तसेच मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.