पुणे : पत्रकारांना जागतिक घडामोडींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अखंड परिश्रमाच्या तयारी बरोबरच चांगला व्यासंग असला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी आज व्यक्त केले.
विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री.खोरे यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख संजय तांबट, प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी पत्रकारिता आता 185 वर्षांची झाली आहे, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले की, नानासाहेब परुळेकरांनी सकाळ वृत्तपत्र जेव्हा सुरु केले तेव्हा वाचकांना ताज्या बातम्या देऊन त्यांनी पत्रकारितेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणले. पत्रकारांनी नेहमीच नवनवीन बदलांना अंगिकारले पाहिजे. चांगले वाचन, व्यासंग हा पत्रकारांसाठी महत्वपूर्ण निकष आहे. पुस्तके आपल्याला समृद्ध करतात, त्यांच्या वाचनातून आपले मन, आत्मा तृप्त होत असतो, असे श्री. खोरे म्हणाले.
संजय तांबट म्हणाले की, आजची पत्रकारिता ही केवळ वृत्तपत्रांशी संबंधित नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वेब पत्रकारिता, सोशल मिडिया अशा अनेक विस्तृत माध्यमांशी जोडली गेली आहे. माहिती अचूक, वेळेत, विश्वासार्ह पोहोचविणे हे आजचे आव्हान आहे. आज तंत्रज्ञानात बदल होत असताना अधिकाधिक लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत माहिती कशी पोहोचेल याकडे लक्ष दिले पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमातून ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, ब्लॉग यापेक्षाही भविष्यात अधिक प्रभावी माध्यमे येऊ शकतात. पत्रकारांना बदलत्या तंत्रज्ञानावर स्वार होता आले पाहिजे.
श्री. तांबट पुढे म्हणाले की, मास मिडियाच्या माध्यमातून लोकांच्या स्वभावाचे पैलू अभ्यासकांना कळू शकतात. त्यामुळे मास मिडियाचा वापर करतानाही योग्य ती सावधानता बाळगली पाहिजे. क्षणक्षणाला खूप माहिती तयार होत आहे. त्या माहितीचे विश्लेषण करुन लोकांपर्यंत आवश्यक तेवढीच माहिती पोहोचवता आली पाहिजे. माणसा-माणसांमधील संवाद वाढविणारी पत्रकारिता अंगिकारली पाहिजे.
प्रास्ताविकात उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी उपस्थितांना शासकीय व अशासकीय क्षेत्रातील पत्रकारांना असलेल्या संधींची माहिती दिली. ते म्हणाले की, चित्रपट, क्रीडा, राजकारण, पत्रकारिता या क्षेत्रात अस्थिरता खूप असली तरी ही क्षेत्रे नाव उंचावणारी आहेत.
दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसंचालक (माहिती) मोहन राठोड व प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मान्यवरांना रोप व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. आभार प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गरवारे महाविद्यालय तसेच मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.