पुणे: राज्यातील 167 शाळांचे दहावीचे निकाल अत्यंत कमी लागले आहेत, अशा शाळांचा शिक्षण विभागातील अधिकारी आढावा घेणार आहेत. या शाळांचा निकालाचा टक्का वाढविण्यासाठी त्या शाळांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच तेथील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
येथील “बालभारती”च्या सभागृहात राज्यातील दहावीच्या कमी निकाल लागलेल्या 167 शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री. तावडे बोलत होते. यावेळी एसएससी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक सुनिल मगर, एन.के. जरग, लक्ष्मीकांत पांडे, व्ही.व्ही. गोसावी, प्राची साठे उपस्थित होत्या.
श्री. विनोद तावडे म्हणाले, अशक्त आणि कमकुवत घटकाला ताकत देण्याचे काम शासनाचे आहे. त्याप्रमाणे राज्यातील दहावीच्या निकालात अत्यंत कमी असणाऱ्या शाळांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार आहे. त्यासाठी या शाळांचा विशेष आढावा शिक्षण विभागातील अधिकारी 15 ऑगस्ट पर्यंत घेणार आहेत. यावेळी त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी अधिकारी संवाद साधतील. त्यानंतर त्या बाबतचा अहवाल शासनाला सादर करतील. या अहवालावरुन योग्य त्या उपयायोजना करण्यात येतील. अशा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भरपूर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच तेथील शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा शाळांच्यामदतीसाठी त्या भागातील चांगल्या शाळा जोडल्या जातील. पुढच्या वर्षी या शाळांच्या निकालात 50 टक्क्यांची वृध्दी करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्यातील कमी निकाल लागलेल्या शाळांतील मुख्याध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

