पुणे, दि. 1 : जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना जुन्नर वन विभागाचे उप वनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिली आहे.
या तालुक्यातील जनतेने कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या चुकीच्या प्रचारास बळी पडून वन जमिनीवर बेकायदेशीर ताबा वा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करु नये. अनुसुचीत जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 नुसार 13 डिसेंबर 2005 नंतर वन क्षेत्रावर ताबा मिळवणे, त्यासाठी वन जमिनी विना परवाना मोजणी करणे, स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामस्त यांचे त्यांच्या गावातील वनावरील असलेल्या हक्कावर गंडांतर आणणे अथवा जमिन नांगरट करणे यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तीसमुह आणि संघटनांवर भारतीय वन अधिनियम 1927 च्या तरतुदीनुसार कठोर कार्यवाहीची तरतुद आहे.
वनसंपत्तीला आग लावून, वृक्ष तोडून अतिक्रमण करण्याचा अथवा पर्यावरणाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करु नये. तसेच राखीव वन क्षेत्रात अनधिकृत पणे प्रवेश करुन राहील्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झाल्यास अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची भरपायी शासनाकडून देण्याची तरतुद नाही. वनक्षेत्रात अशा प्रकारे हानी झाल्यास संबंधित व्यक्ती विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असेही श्री. म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.


