आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे : मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे
पुणे दि. 10 : समन्वय आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता यावर निवडणुकांचे यश अवलंबून आहे, ही बाब लक्षात घेऊन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानासाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्यरित्या सर्व टप्प्यावरील प्रशिक्षण देण्यात येईल याची दक्षता घ्यावी. मतदान प्रकियेतील सर्व घटकांचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय राहील यासाठी सर्व ती काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे दिल्या.
मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक विधान भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक, निवडणूक निरीक्षक रमेश काळे, दिपक नलवडे, प्रकाश कदम, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व सनियंत्रण अधिकारी उपस्थित होते.
मतदार जागृतीवर जिल्ह्यात चांगले काम होत आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले की, योग्य प्रशिक्षणावर निवडणुकांचे यश अवलंबून असते ही बाब लक्षात घेऊन सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना हॅण्ड्स ऑन प्रशिक्षण देताना लहान- लहान गटामध्ये दिले जावे याकडे लक्ष द्यावे. निवडणूक आयोगाचे आदेश, निर्देश व मार्गदर्शक पुस्तिका हे कोणताही निर्णय घेताना महत्वाचा दस्ताऐवज असून त्यामध्ये सर्व निवडणुकीशी सर्व बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचा प्रभावी उपयोग करावा. मतदान कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने काम केल्यास कोणतीही अडचण उद्भवत नाही. संबंधित महसूल विभागात महसूल कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात संपर्क क्रमांकाचे आदान- प्रदान करावे, जेणेकरुन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काही अडचणी उद्भवल्यास संपर्क साधने सोपे होईल.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व विविध विभागांना अनेक सूचना केल्या. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात दहा आदर्श मतदान केंद्रे तयार करावयाची असून त्याठिकाणी पिण्याचे पाणी, सावली आदी मूलभूत सुविधांसह शक्य असल्यास रांगोळी, नवमतदारांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत. उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व उमेदवारांना पत्र देऊन उमेदवारांची बैठक घ्यावी. भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडीओ सर्वेलन्स पथके यांनी आपल्या कामाला गती द्यावी तसेच आकडेवारी व्यवस्थित कळवावी. आवश्यकता असल्यास एनडीए च्या हद्दीतील मतदान केंद्र हलवावयाचा निर्णय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी घेऊ शकतात.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु, देशी- विदेशी मद्याच्या वाहतुकीवर व अवैध वापरावर प्रभावी कारवाई करावी. बँकेकडून होणाऱ्या रोख रकमेच्या वाहतुकीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास आधीच दिल्यास विनाकारण पोलीस तपासणी व इतर तपासणीमध्ये वेळ जाणार नाही. शक्यतो 10 मतदान केंद्रांसाठी एक क्षेत्रीय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. परंतू भोर- वेल्हे या भागातील दुर्गम गावांत पोहोचण्यास लागणारा वेळ लक्षात घेता 2 ते 3 मतदान केंद्रांसाठी एक क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात यावा आणि त्याच्याकडे 1-2 अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम) ठेवण्यात यावीत. प्रत्येक पथकासोबत एक व्हीडीओग्राफर नेमण्यात यावा.
निवडणूक कालावधीत कोणीही बेकायदेशीर काम करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही याची जाणीव करुन द्यावी. त्यादृष्टीने कारवाई करावी. मतदानासाठी सायं. 5.30 वाजेपर्यंत येणारा एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. राव यांनी यावेळी दिल्या.
आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे : अरुण डोंगरे
मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे म्हणाले की, निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी. पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे यासाठी परवानग्या घेतल्या आहेत काय हे पाहण्यासह याचा खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा. रात्री दहा वाजल्यानंतर कोणत्याही बैठकांना परवानगी दिली जाऊ नये तसेच अशा बैठका होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. अवैध दारु, मद्याचा वापर यावर काटेकोर लक्ष ठेऊन कारवाई करावी. हे सर्व करत असताना सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक सुवेज हक म्हणाले की, एखाद्या गावात मतदानावर बहिष्काराचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्यास तेथील कोणी मतदान करु इच्छीत असल्यास संबंधितांना पोलीसांनी संरक्षण द्यावे. भिमाशंकर यात्रा तसेच पुरंदर तालुक्यातील वीर- म्हस्कोबा यात्रेसाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. भोर- वेल्हा भागासाठी मतदानाच्या दिवशी एसटीच्या अधीकच्या फेऱ्या होतील यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा.
श्री. हक पुढे म्हणाले की, हद्दपारी केलेल्या व्यक्तींनाही मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा व्यक्ती मतदानाच्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्यावर हजर होऊ शकतात. तेथून पोलीस कर्मचाऱ्यासह जाऊन संबंधित मतदान केंद्रावर मतदान करुन परत पोलीस ठाण्याला हजेरी लाऊन त्यांना हद्द सोडून जाण्याचे आदेश दिले जातील. मतदान कालावधीत गुन्हेगारी कारवाई करु शकणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करुन त्यांच्याविरुद्ध कलम 144 (3) अन्वये 3 ते 7 दिवसांपर्यंत प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे आदेश पोलीसांनी काढावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत निवडणूक निरीक्षक रमेश काळे, दिपक नलवडे, प्रकाश कदम यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रारंभी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून निवडणूक कामकाजाचा आढावा सादर केला. त्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय निवडणूक अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय निवडणूक कामकाजाचा आढावा सादर केला.