भारत-न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस कप स्पर्धा सामन्यांना उद्यापासून सुरुवात
- 43 वर्षानंतर डेव्हिस कप स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन
पुणे, दि. 02– पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून वाहन उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. गेल्या काही वर्षापासून पुणे माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याला “पूर्वेचे ऑक्सफर्ड” म्हटले जाते. आता यापुढे पुणे महाराष्ट्राची स्पोर्टस् कॅपीटल म्हणून उदयास येईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केला.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत आशिया-ओशेनिया गटातील भारत-न्यूझीलंड संघादरम्यान खेळण्यात येणाऱ्या डेव्हीस कप टेनिस स्पर्धेचा ड्रॉ राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डेव्हीस कप स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कॉरनिलोव्ह, भारतीय टेनिस महासंघाचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार, स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर, भारत व न्युझीलंड संघाचे खेळाडू उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव म्हणाले की, कुशल संघटक, युध्दकौशल, मुत्सदी शासक, दूरदृष्टी व शौर्याचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे बांधण्यात आलेल्या क्रीडानगरीत ही स्पर्धा होत आहे, याचा मला आनंद आहे. सन 2006 साली मुंबई येथे पार पडलेल्या डेव्हिस कप स्पर्धेचा ड्रॉ राजभवन येथे काढण्यात आला होता. सन 2006 मधील स्पर्धा व पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये भारताचा टेनिस स्टार लियांडर पेस हा समान दुवा आहे. गेली सुमारे पंचवीस वर्षे लियांडर पेसने भारतीयांच्या टेनिस खेळाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण केल्या, असे सांगून, तो भारताचा “रॉजर फेडरर” आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
डेव्हिस कप स्पर्धेला 117 वर्षांचा इतिहास असून, जवळपास 135 देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या खेळामुळे जनतेमध्ये व खेळाडुंमध्ये देशभक्ती निर्माण होते. शारीरिक व मानसिकदृष्टया परिपूर्ण खेळाडूच या स्पर्धेमध्ये यशस्वी होतात. पुणे येथे 43 वर्षांनी डेव्हिस कप स्पर्धा पार पडत आहे, याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. पुणेकरांनी नेहमीच खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेतून स्थानिक खेळाडूंनी प्रोत्साहन घेऊन क्रीडा नैप्युण्य वाढवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांनी एकत्र येऊन टेनिस व इतर खेळांच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करावेत व उदयोन्मुख खेळाडूंसाठी राज्यभर प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.
खेळामध्ये जय-पराजय होत असतात. मात्र खेळ, डेव्हिस कप स्पर्धा आणि स्पर्धकांची खेळाडूवृत्ती नेहमी विजयी होईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासगर राव यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र टेनिस संघटनेचे सचिव राहुल क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत व न्युझीलंड संघातील खेळाडूंचे फेटा बांधून व औक्षण करुन पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे टाळयांच्या गजरात स्वागत केले.
डेव्हिस स्पर्धेचे ड्रॉ
प्रथम एकेरी मॅच-युकी भांबरी (भारत) विरुध्द फिन टिअरर्नी (न्युझीलंड), द्वितीय एकेरी-रामकुमार रामनाथन (भारत) विरुध्द जोस स्टॅथम (न्युझीलंड), प्रथम दुहेरी-लियांडर पेस-विष्णु वरदान (भारत) विरुध्द आर्टेम सीटाक व मायकेल व्हिनस (न्युझीलंड), द्वितीय दुहेरी-युकी भांबरी व रामकुमार रामनाथन (भारत) विरुध्द फिन टिअरनी व जेास स्टॅथम (न्युझीलंड)