पुणे, दि. 20: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजनबध्द आणि चोख काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वय अधिकारी यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा परिषद व पंचायत समिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. राव यांनी मतदार यादी, मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी, मतदान केंद्र तपासणी, मतदार जनजागृती प्रभावीपणे करण्यासाठीच्या नियोजनाचा तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच विविध माध्यमांचा वापर करुन मतदानाचे प्रमाण वाढविण्यास सांगितले. आचारसंहितेच्या अनुषंगाने बॅनर्स, पोस्टर्स, भित्तीपत्रके तात्काळ काढावीत. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी तसेच मतदान केंद्रांची तपासणी करुन त्याचा अहवाल निवडणूक शाखेला तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच प्रत्येक मतदार संघातील किमान १० मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करावीत, जेणेकरुन मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल,असेही त्यांनी सांगितले.
श्री. राव म्हणाले, आचारसंहिता भंगांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध भरारी पथके तैनात ठेवावीत. यात प्रत्येक गटनिहाय किमान एक पथक नेमावे. तसेच आचारसंहिता प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विविध कार्यक्रम, सभा इ. संबंधी विविध राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्वरीत निर्णय घेऊन तो संबंधितांना कळवावा, कायदा व सुव्यवस्थाबाबतची प्रकरणांवर गुणवत्ता तपासून त्वरीत निर्णय घ्यावा, मतदार जनजागृतीसाठी तालुकापातळीवर आवश्यक विविध कक्ष तात्काळ स्थापन करावेत व नियोजनबध्द काम करावे.
पेड न्यूज मध्ये मोडणाऱ्या बातम्या प्रसिध्द होत असल्याचे दिसून आल्यास यासंदर्भात जिल्हास्तरीय पेड न्यूज समितीला तात्काळ कळवावे, जेणेकरुन या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात करता येईल व पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला विविध खात्याचे अधिकारी, संबधित कर्मचारी उपस्थित हो