पुणे , : निश्चलनीकरणानंतर रोखरहित व्यवहाराला पर्याय नाही. निश्चलनीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे व दैनंदिन कार्यालयीन व्यवहार कॅशलेस करावा यासाठी कोषागार कार्यालयाच्यावतीने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवहारासंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
रांगा थांबवायच्या असतील तर डिजिटल पेमेन्ट चा वापर अनिवार्य आहे.असे प्रतिपादन वरिष्ठ अधिकारी संजय राजमाने यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. UPI (यूनिफाईड पेमेन्ट इंटरफेस) च्या साह्याने मोबाईलद्वारे सुरक्षित पद्धतीने रोखीचे व्यवहार करण्याबाबत यावेळी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शासकीय कार्यालयात मोठया प्रमाणावर कॅशलेस व्यवहार करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेचा लाभ घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे असे ही यावेळी ते म्हणाले.
विविध बँकांनी कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहेत. संबंधित बँकेचे अँप तसेच मोबाईलवर नेटचा वापर न करता देखील आपण मोबाईलद्वारा आपण रोखीचे व्यवहार करू शकतो, असे कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक प्रवीण पोळ यांनी सांगितले. प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डाचा वापर कशा पद्धतीने करावा, तो कसा सुरक्षित आहे, MID तसेच TID चा वापर, UPI रेजिस्ट्रेशन प्रोसेस इत्यादीबद्दल सखोल मार्गदर्शन कोटक महिंद्रा बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक आदित्य बावडेकर यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
बँकेच्या अँप्स,तसेच इंटरनेट बँकिंग संदर्भात मार्गदर्शन कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक भूषण नाईक यांनी केले. सदर कार्यशाळेत शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला.

