चाकण औद्योगिक परिसातील होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन
पुणे : गेल्या दहा वर्षात देशात होरीबा कंपनीने आपल्या उत्पादन व सेवा क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. पुणे परिसरात ॲटोमोबाईलच्या 80 टक्के सुट्या भागांची निर्मिती होते. होरीबा या कंपनीने चाकण या परिसरात प्रकल्प सुरू केल्यामुळे निश्चितच याचा फायदा होईल. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठी नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे, यापुढे होरीबाने नागपूर व औरंगाबाद सारख्या ठिकाणी गुंतवणूक करावी. शासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
होरीबा इंडीया कंपनीची भारतातील दशकपूर्ती व चाकण औद्योगिक परिसरात नव्याने सुरु केलेल्या होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सू, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार संजय भेगडे, होरीबा ग्रुपचे चेअरमन डॉ. आर्त होरीबा, होरीबा इंडीया कंपनीचे चेअरमन डॉ. जय हकू, राजू गौतम उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ॲटोमोबाईलच्या उत्पादनात भारत जगात आग्रक्रमावर असून या क्षेत्रातील भारताची बाजारपेठही मोठी आहे. ही बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात आणखी गुंतवणुकीला वाव आहे. देशात महाराष्ट्र ॲटोमोबाईल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे आणि परिसरात यातील 80 टक्के उत्पादने तयार होतात. जपानमधील उद्योजकांसाठी महाराष्ट्र कायमच पहिल्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. पुण्याबरोबरच देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असणारे नागपूर व सर्व सुविधांनीयुक्त असणाऱ्या औरंगाबाद शहरातही होरीबा व अन्य उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी प्राधान्य द्यावे. पुण्यातील ॲटोमोबाईल क्षेत्र आपल्या पंतप्रधानांचे मेक इन इंडीयाचे स्वप्न साकार करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असून मनुष्यबळ हीच आपल्या देशाची ताकत आहे. याच जोरावर येत्या काही वर्षात शंभर टक्के मेक इन इंडीयाकडे आपली वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी आणि विस्तारासाठी महाराष्ट्र हे अतिशय चांगले ठिकाण असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, जपानसह इतर देशातील उद्योजकांनी महाराष्ट्रातील पोषक वातावरणाचा फायदा करुन घ्यावा. उद्योजकांना सर्व सुविधा पुरविण्यास महाराष्ट्र शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
जपानचे राजदूत श्री. हिरामात्सू म्हणाले, भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीचे संबंध अतिशय दृढ असून आर्थिक संबंधही विस्तारत आहेत. जगातील जपानच्या एकूण गुंतवणुकीच्या सर्वाधिक गुंतवणूक भारतात आहे. पुणे हे भारतातील ॲटोमोबाईल हब असून औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार शिवाजीराव आढाळराव-पाटील म्हणाले, महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. चाकण औद्योगिक परिसरातही उद्योजकांची गुंतवणुकीला पसंती आहे. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. होरीबा यांनी केले. तर शेवटी आभार राजीव गौतम यांनी मानले.