मुंबई : केरोसिन, डिझेल व इतर इंधन द्रवात भेसळ केल्याचे आढळून आल्याप्रकरणी अंबरनाथ येथील इंडस्ट्रियल ईस्टर्स ॲण्ड केमिकल्स या कंपनीवर शिधावाटप विभागाच्या दक्षता पथकाने मुद्देमाल जप्तीची कारवाई केली. या कारवाईत एक कोटी 21 लाख 52 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तु कायद्यात नमूद वस्तूंचा काळा बाजार तसेच बेकायदेशीर साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर शिधावाटप विभागाच्या दक्षता पथकामार्फत अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात येते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
इंडस्ट्रियल ईस्टर्स अँड केमिकल्स या कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात केरोसिन, डिझेल, पेट्रोलसदृश द्रव पदार्थ, नाफ्ता, अन्य पेट्रोलियम पदार्थांचा बेकायदेशीर साठा भूमिगत टाक्या तसेच लोखंडी पिंपात केल्याचे या धाडीत आढळून आले. या प्रकरणी कंपनीचे मालक राधेश्याम गुप्ता व अन्य भागीदार, पदाधिकारी यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक कोटी एकवीस लाख बावन्न हजार चारशे रूपये असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.