पुणे,दि. 01 :- विक्रीकर हा राज्याच्या महसूलाचा एक महत्वाचा भाग असून हे महसूली उत्पन्न राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी व विविध विकास कामांसाठी उपयोगात येते.
यासाठी विक्रीकर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमूख होऊन कर संकलन वाढवावे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
विक्रीकर दिनाच्या निमित्ताने आज यशदा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर प्रशांत जगताप, आमदार शरद रणपिसे, अप्पर विक्रीकर आयुक्त ओ.चै.भांगडीया यांच्यासह विक्रीकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्या करदात्यांना आज गौरविण्यात आले ते सन्मानार्थी उपस्थित होते.
शासनाचा चेहरा म्हणून व्यापाऱ्यांसमवेत, जनतेशी संवाद साधतांना, त्यांच्याशी संपर्क करताना विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वर्तणूक आणि संपर्क या गोष्टी महत्वाच्या ठरतात असे सांगून पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन कर संकलन वाढवावे.
‘जीएसटी’ मुळे देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत मोठी सुधारणा होत आहे. अशास्थितीत विक्रीकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीतील भूमिका अधिक निर्णायक ठरणार आहे.
त्यादृष्टीने विक्रीकर विभागाने केलेली तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही पालकमंत्र्यांनी काढले. वस्तु व सेवाकर प्रणालीमुळे एकसमान कर, एकसमान कर प्रणाली अस्त्विात येणार असेही ते म्हणाले.
‘जीएसटी’चा प्रचार व प्रसार लोकप्रतिनिंधी प्रभावीपणे करावा असे आवाहन आमदार शरद रणपिसे यांनी यावेळी बोलताना केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करप्रणाली सुटसुटीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्राच्या उभारणीमध्ये विक्रीकर विभागाचा वाटा मोठा आहे, असे सांगून महापौर प्रशांत जगताप यांनी विक्रीकर विभागाने ‘जीएसटी’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना केली.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते कर निर्धारण व कर संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या आठ संस्था आणि पाच विक्रीकर निरिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रशस्तीपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. ‘वस्तू व सेवाकर-एक दृष्टीक्षेप’ या माहितीपूर्ण पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्र्यांच्याहस्ते
करण्यात आले.
विक्रीकर दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळीउपस्थितांना दाखविण्यात आले. अशाप्रकारे विक्रीकर दिन साजरा करण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला.

