पुणे : राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थातर्फे पंतप्रधान कौशल्य विकास योजना राबविण्या येते. याच धर्तीवर राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास अधिकारी विजय कानिटकर यांनी दिली.
संवादपर्व या उपक्रमाद्वारे शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती गणेशोत्सवादरम्यान जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत चिंचवड येथील जयगुरुदत्त गणेश मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन चिंचवडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे उपस्थित होते.
श्री. कनिटकर यावेळी म्हणाले की, कौशल्य विकासावर आधारित रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी रोजगार मेळावे, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. याचा लाभ तरुणांनी घ्यावा, यावेळी त्यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांची माहिती दिली. जिल्ह्यामध्ये २४६ संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. २०१६-१७ वर्षात १९९० लाभार्थिंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यत ५७४१ लाभार्थींना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड येथे कौशल्य विकासाचे शिक्षण देणाऱ्या १६ संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. हे प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येते, याचा फायदा तरुणांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन चिंचवडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, तरुण, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


