पुणे – पुणे शहरातील बावधन भागाची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता तेथील तरूणांच्या सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानने ‘दिलीप वेडेपाटील स्पोर्ट्स अकॅडमी’, स्पोर्ट्स ग्राउंड ची उभारणी केली. या स्पोर्ट्स अकॅडमीचे रविवार दिनांक २२ मेला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले. एनडीए पाषाण रोड येथील हॉटेल डी पॅलेसच्या मागे या स्पोर्ट्स ग्राउंडची उभारणी करण्यात आली आहे.
एक एकरवर उभारण्यात आलेल्या या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इ. खेळांचा समावेश असेल. तसेच या खेळांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षक नेमण्यात आले आहे. स्थानिक लोकांना माफक दरात या खेळांचे प्रशिक्षण घेता येईल.
याप्रसंगी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक अॅड. योगेश मोकाटे, नगरसेवक संजय लोणकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा साविताताई दगडे, हिंजवडीचे सिनिअर पीआय वायकर, तसेच राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा स्पोर्ट्स अकॅडमी उभारणे ही काळाची गरज आहे. सामाजिक एकता तसेच लोकांना एकत्र आणण्याकरीता हा एक चांगला उपक्रम आहे. त्यामुळे शहराचा सर्वांगिण विकासही होतो. निखळ जनसेवा करणारा, सर्वाना एकत्र घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला जनता कधीच विसरत नाही. सामान्य जनता त्याची पावती नेहमीच देत असते. पालकमंत्री म्हणून मी नेहमी आपल्या बाजूने उभा राहील, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, शहराची मोठ्या वेगाने वाढ होत असताना, मुलभूत सुविधांचा विचार करून दिलीप वेडेपाटील यांनी ही अद्ययावत वास्तू उभी केली हा एक स्तुत्य उपक्रमच आहे. यामुळे पुण्यातून आणि पर्यायाने महाराष्ट्रातून देशाला चांगले खेळाडू मिळतील.
बावधन हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे व अपूऱ्या सोईसुविधांमुळे येथील स्थानिक लोकांना अनेक संधीना मुकावे लागले, या स्थानिक लोकांचा विचार करून आम्ही या अकॅडमीची उभारणी केली आहे, अशा भावना राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप वेडेपाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या स्पोर्ट्स अकॅडमीमुळे भावी पिढीला शारिरीक आरोग्यासह खिलाडू वृत्ती व मानसिक आरोग्यही लाभेल. आपल्या माणसांमध्ये रग जास्त आहे. ही रग जिरवण्यासाठी जे सकस मैदान तयार केले त्याबद्दल दिलीप वेडेपाटील यांचे मनःपूवर्क आभार असे मत शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले.

