हिंदी मराठीतील कलाकारांनी मिळून घातलेला ‘धिंगाणा’ येत्या ८ डिसेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. धमाल कथानक, कलाकारांची भन्नाट अदाकारी, ठेका धरायला लावणारं संगीत असा करमणुकीचा भरगच्च मसाला असणाऱ्या ‘धिंगाणा’ या मराठी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ममता प्रोडक्शन हाऊसची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे निर्माते समीर सदानंद पाटील असून दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांचे आहे.
ठेका धरायला लावणारी ही गाणी प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असं सांगत हा ‘धिंगाणा’ प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करेल असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच मराठी सिनेमात काम करताना मजा आल्याची भावना शाहबाझ खान व कुनिका यांनी बोलून दाखवली. आनंद शिंदे यांनी या चित्रपटात ‘धिंगाणा’ हे चित्रपटाचे शीर्षक गीत गायले असून या गीताची निर्मिती सचिन पाठक (यो) यांच्या लेखणीतून झालेली आहे. या गीताला अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले आहे. शिंदेशाही घराण्यातील कर्तबगार सुपुत्र आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील ‘झिंगालाला’ हे गीत गायले असून या गीताची रचना वैभव जोशी या सुप्रसिद्ध कवीने केली आहे. तसेच या चित्रपटातील वेगळ्या धाटणीचे व युवा वर्गाला भावणारे ‘बिल्ली हुँ मै’! हे हिंदी, मराठी, आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतील गीत जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारले आहे. राज्ञी त्यागराज या नवोदित गायिकेला शशांक पोवार या संगीतकाराने प्रथमत: सिनेमात गाण्याची संधी दिली असून राज्ञी त्यागराज हिने या संधीचे सोने केले आहे. आणि प्रेक्षकांना तिच्या आवाजाची व संगीत रचनेची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.
‘धिंगाणा’चं दिग्दर्शन करणाऱ्या चंद्रकांत दुधगावकर यांनी या सिनेमातून चीट फंड घोटाळ्याचा विषय हाताळला आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर, प्रकाश धोत्रे या मराठी कलाकारांसोबत रझा मुराद, शाहबाझ खान, अवतार गिल, कुनिका हे हिंदीतले कलाकार ही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. सुजीत कुमार यांनी या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘धिंगाणा’ ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.