पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आज सकाळी साडेदहा वाजता ट्वीटर वरून कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मिरवणुकीने जाऊन दाखल केला .तत्पूर्वी त्यांनी केसरीवाड्यात जाऊन टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल यांची भेट घेतली . कसबा गणपती आरती समयी त्यांच्या समवेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , सुशिलकुमार शिंदे ,मोहन जोशी ,संग्राम थोपटे , विश्वजीत कदम, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, दीपक मानकर,संजय मोरे , प्रशांत जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .मिरवणुकीने जल्लोषात जाऊन त्यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे असलेल्या निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कसब्यात इतिहास घडणार..!!
यावेळी धंगेकर म्हणाले कि,’ मायबाप जनता व पुण्यनगरीच्या आराध्य दैवतांच्या कृपेने आजवर माझ्या सत् सत् विवेकबुद्धीने मदत करताना ज्या ज्या व्यक्ती २४ तासातील ज्यावेळी – ज्याकाळी माझ्याजवळ आल्या, त्या त्या व्यक्तीचे काम मार्गी लावण्याचे व्रत गेली ३० वर्ष मी माझे कर्तव्य म्हणून पूर्ण करत आलो आहे. आज हा सर्व काळ माझ्या डोळ्यासमोरून गेला,माझा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीतील अबाल – वृद्धांची गर्दी व त्यांचा उत्साह पाहताना मला या निवडणुकीत कसब्यात होणाऱ्या परिवर्तनाची झलक दिसून आली.कसबा विधानसभा मतदारसंघात करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न येत्या काळात माझा राहील. खरं पाहिलं तर हा कालावधी दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा होता, परंतु त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या हातून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी या कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडून येणाऱ्या उमेदवाराची असेल. सहाजिकच कसबा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या 30 वर्षात केलेल्या कामांच्या अनुभवाच्या बळावर मायबाप जनतेने संधी दिल्यास येणारा काळ देखील कसब्यात सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून त्यांच्या सेवेत व्यतीत करेल, असा शब्द मी आज अर्ज भरल्यानंतर सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे .


