अंबिका+रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक 23 डिसेंबर 2017 पासून रंगभूमीवर आले आहे. निर्मात्या सुजाता मराठे आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या ह्या नाटकाचा मुहूर्त 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. व. पु. काळे यांच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीवर आधारित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक आहे.
निर्माती मुक्ता बर्वे यांची छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतरची ही पाचवी नाट्यनिर्मिती आहे. मुक्ता बर्वे यांच्याच दीपस्तंभ, CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे यांनी ह्या नाटकाव्दारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहेत. “ढाई अक्षर प्रेम के” नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत दिनू पेडणेकर.
वपुंच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. पुण्यात अनेक हौशी व प्रायोगिक नाटकं करणारे दिग्पाल लांजेकर ह्या नाटकाव्दारे व्यावसायिक नाट्यसृष्टीत प्रवेश करत आहेत.
CODE मंत्र या नाटकात कर्नल निंबाळकरांची भूमिका करणारे अभिनेता अजय पुरकर ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. रुद्रम मालिकेत छोटीशी भूमिका साकारणारी तरीही लक्षात राहिलेली अभिनेत्री किरण खोजे या नाटकात अजय पुरकर सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ह्या दोघांशिवाय ‘ढाई अक्षर प्रेम के’ मधे सचिन देशपांडे, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, नितीश घारे, अश्विनी कुलकर्णी ह्यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असून, पार्श्वसंगीताची बाजु नुपूरा निफाडकर ह्यानी सांभाळली आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून प्रकाशयोजना राहुल जोगळेकरनी केली आहे.
‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकाची निर्माती आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, ” एक सकस, ताजीतवानी आणि मनोरंजक कलाकृती आम्ही रंगभूमीवर घेऊन आलो आहोत. वपुंच्या कथेला दिग्पालने दिलेलं नाट्यरूपांतर आम्हांला तर आवडलंच पण त्यासोबतच वपुंच्या कन्या स्वाती चांदोरकरांनीही दिग्पालची पाठ थोपटलीय. त्यामूळे हे नाटक रसिकांनाही आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.”
निर्माती सुजाता मराठे म्हणते, “निर्माती म्हणून हे माझं पहिलं नाटक, त्यात मुक्ताची साथ मिळाल्याने हुरूप आलाय. दिग्पालच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ह्या नाटकाला उत्तम कलाकारांची साथ मिळालीय. त्यातच पहिल्या प्रयोगापासून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने उत्साह अधिकच वाढलाय.”
साईसाक्षी आणि अनामिका रसिका आपलं नाटक जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या रसिकांसाठी निर्मिती संस्था एक विशेष कॅशबॅक ऑफर घेऊन आली आहे. ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या अगोदरच्या कोणत्याही प्रयोगाचे तिकीट पूढच्या प्रयोगाचे तिकीट काढण्यासाठी आणल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे.