मुंबई : विविध शासकीय कारणांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने मिळावा यासाठी यासंबंधीची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पोलीस महासंचालक सतीश माथूर व विविध विभागाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिनात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकरी त्र्यंबक महागु गायधने यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास झालेल्या विलंबासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निशांत पाटील (ता. कराड जि. सातारा) यांनी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन ॲण्ड मॅनेजमेंट, वाठार ता. कराड या संस्थेविरुध्द केलेल्या तक्रारीच्या न्यायालयीन प्रकरणात विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताची बाजू ठामपणे मांडावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांना निश्चित कालावधीतच सेवा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
या लोकशाही दिनामध्ये नांदेड, पुणे, सांगली, सातारा, अकोला, नागपूर, भंडारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, चंद्रपूर, रायगड, जालना, परभणी गोंदिया येथील नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणी करण्यात आली. प्रश्न तत्काळ निकाली निघाल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

