रत्नागिरी दि. २० – तौक्ती चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. भयंकर फटका बसल्यामुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासू नव्हे तर आत्मघाती सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्तांना अजुन पुर्ण मिळालेली नाही. काहीही झालं की केंदाकडे बोट दाखवायच हे नेहमीचेच झालं आहे, अशी टिका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची पहाणी करणार आहेत. त्यांच्यासमवेत विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे देखील आहेत.
निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा भरून निघत नाही तोच तौक्ते चक्रीवादळाने राज्याला, विशेषतः कोकणाला झोडपून काढलं. कोकणातील नुकसानीची पाहणी कालपासून दोन्ही विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि दरेकर हे करीत आहेत. काल रायगड जिल्ह्यातील काही भागाची पहाणी केल्यानंतर आज रत्नागिरीला निघण्यापूर्वी त्यांनी पोलादपूर येथे स्थानिक महसूल, पोलीस आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून चक्रीवादळ आणि करोना याबाबतची माहिती घेतली. यानंतर त्यांनी रत्नागिरीकडे प्रयाण केले.
ताउक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सर्वप्रथम रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेऊन कोरोना परिस्थिती व ताउक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.
घोसाळकर कुटुंबीयांना मदत करा

रत्नागिरी तालुक्यातील बोरज वाडी नजीक सोमवारी दि.१७ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने दीपक घोसाळकर व त्यांचा पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुबांवर संकट ओढवल असुन त्यांच्या कुटुबांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले, तार पडल्यामुळे ही जीवितहानी झाली, या कुटुंबाचे दुःख मोठे आहे, पण दीपक घोसाळकर यांच्या कुटुबांच्या काही मागण्या असून त्या।सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील राहू, असेही आश्वासन त्या कुटुंबाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
संगमेश्वर येथे भाजपा २५० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार
संगमेश्वर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व परकार हॉस्पिटललाही आज फडणवीस व दरेकर यांनी भेट दिली आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भाजप पक्षाकडून परकार हॉस्पिटलमध्ये २५० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
नुकसान झालेल्यांना तातडीने मदत करा
देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी खेड तालुक्यातील बोरज येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली, नुकसानग्रस्त मच्छीमार व आंबा बागायतदार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार आता पर्यत ५०० हजार घरांची पडझड झाली, फळबागांचे नुकसान झाले. तौक्तीच्या झंझावाताने अनेकांची घरे मोडकळीस आली आहेत. चक्रीवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांच मोठं नुकसान झालं, बोटी वाहून गेल्या, शाळांचे छप्पर उडाले, या सर्व नुकसानग्रस्तांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
वाट न पाहता प्राथमिक मदत तरी द्या
निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस ज्या घोषणा सरकारने केल्या त्या अमलात आणल्या नाहीत. त्यावेळी नुकसान झालेल्या शाळांची अजून दुरुस्ती सरकारने केलेली नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरीसारख्या मोठ्या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असताना राज्यसरकारने या जिल्ह्याला फक्त १५० कोटी रुपये दिले होते. त्यावेळी केवळ सरकारने पोकळ घोषणा केल्या, जी मदत दिली ती अतिशय तुटपुंजी होती. कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले आहे, परंतु निसर्ग वादळ असो किंवा हे चक्रीवादळ राज्यसरकार कोकणासाठी हात आखडता घेत असून केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित असलेल्या जिल्ह्यांना २०० कोटी देताना सुद्धा कारणे दिली जातात ते योग्य नाही. योग्य वेळी मदत दिली पाहिजे, अशी मागणी करत आता वाट न पाहता प्राथमिक मदत तरी द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच फलित व्हावं
मुख्यमंत्र्यांचा मागील रायगड जिल्ह्याचा दौरा पाहता ज्या घोषणा केल्या होत्या त्या अमलात आणल्या नाहीत. आता कोकणात आल्यानंतर भरीव मदत त्यांनी जाहीर करावी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं फलित होईल. निसर्गच्या नुकसानीसाठी सरकारने प्रति झाड ५०- १०० रुपये दिले होते, ज्याचा काहीही फायदा येथील लोकांना झाला नाही. आता आंब्याचे नुकसान प्रचंड झाले आहे, इतरही फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांना निकष बाजूला ठेऊन विशेष मदत देण्याची आवश्यकता आहे. शंभर टक्के नुकसानभरपाई सरकार देऊ शकत नाही, हे आम्हालाही मान्य आहे, परंतु किमान कोकणवासीयांना पुढचं वर्ष काढता येईल आणि पुनः उभं राहता येईल, एव्हढी मदत तरी सरकारने द्यावी.
भाजपचा पुढाकार
ऑक्सिजन बँक जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड, आयन राणे यांनी आपल्या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्सिजनेटेड कोविड सेंटर सुरू केले आहे. आज मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० कॉन्सनट्रेटरची ऑक्सिजन बँक जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. ज्या ठिकाणी सरकारला मदत करता येईल, त्याठिकाणी जनहितार्थ भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी सरकारी यंत्रणेला मदत करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड माजी खासदार नीलेश राणे उपस्थित आहे.

