‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Date:

मुंबई- ”ये दिवार तुटती क्यू नही… ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है…” अशा शब्दात महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात लगावला.

”मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे,” असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अजित पवार यांनी यावेळी फुंकले आणि एक उर्जा कार्यकर्त्यांमध्ये भरण्याचे काम केले. सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याबद्दल मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अजित पवार यांनी यावेळी अभिनंदन केले.

आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील. ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत.ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत नवाब मलिक निवडून आले आहेत. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. पुढच्या काळात समविचारी पक्षांना घेवून शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी केले. महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे अजितदादा पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल असेही अजित पवार म्हणाले.

समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे सांगतानाच आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दुर ठेवा. दोन वर्ष त्यांना काम करु द्या असा आदेश अजित पवार यांनी दिला.

पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले त्यामध्ये सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले आहेत. मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत. त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करु द्या असेही अजित पवार म्हणाले.

गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत निघत आहे. पोलिसांना चांगली घरे कशी देता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. डबेवाल्यांनाही विश्वास देण्याचा माझ्या सहकार्‍यांचा प्रयत्न आहे. मुंबापुरी सर्वांची आहे त्यांना ती आपली वाटली पाहिजे असे काम आपल्याला करायचं आहे असे कार्यकर्त्यांना बजावले. हे मि‌शन शिवसेना व इतर पक्षांच्या विरोधात आहे अशा वावड्या उठवल्या जात आहेत. परंतु आमचे हे मिशन पक्षाचा जनाधार कसा वाढेल यासाठी आहे. जे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे काम होत आहे ते पुर्ववत करण्याचं काम यातून होणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे ती राहिली पाहिजेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसर्‍या क्रमांकावर राहिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील माझ्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापसात संघर्ष न करता पक्षाचे काम कसे वाढेल याकडे लक्ष द्या. तुम्ही चांगले वागलात तर ते तुमच्याशी चांगले वागतील असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या आवारातील स्मारक उभे करणारच असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले. आपल्या विचाराचं सरकार आलं आहे तसं आपल्या विचाराची महानगरपालिका आली पाहिजे त्यासाठी नगरसेवक निवडून आणा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे. तर शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुंबईतून झाला आहे. मात्र पक्षाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केलं गेले आहे. देशात आणि राज्यात पवारसाहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची लोकप्रियता वाढत आहे तशी काम करण्याची त्यांची तरुणांसारखी उमेदही वाढत आहे. मात्र आपण कार्यकर्ते कमी पडत आहोत अशी खंत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

शहरी प्रश्नाकडे केंद्रबिंदु म्हणून पाहिले पाहिजे तेथे आपण कमी पडलो आहोत. शहरातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार करायला हवा. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सर्वाधिक मते मिळाली होती. त्यामुळे शहरी भागातील लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात तर ग्रामीण भागात वेगळया असतात असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. भाजपाने दिल्लीत सगळे मंत्री, खासदार उतरुनही दिल्लीत आप ला ६२ जागा कशा मिळाल्या. तर त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे आपण लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. मुंबईच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली तर राष्ट्रवादीला यश नक्की मिळेल. मुंबई महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला आतापासूनच कामाला लागलो तर ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येवू शकतात असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो तसा सन्मान मुंबईच्याही कार्यकर्त्यांचा मंत्र्यांनी करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत वेगळी ओळख निर्माण करेल असं मला वाटतं असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

मुंबईत कोण उपाशी मरत नाही. ही आपली मुंबई आपल्याला जगायला शिकवते. चाळ, झोपडपट्टीमधील शौचालय सुधारण्याचे काम येत्या काळात करणार आहे. या गोरगरीब लोकांना हक्काचं घर देण्याचे काम मला करायचं आहे. मुंबईच्या कुठल्याही कामासाठी मला हाताला धरुन घेवून जा ते काम मी करेन असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मुंबई महापौर बसवण्यासाठी राष्ट्रवादीचा हातभार लागला पाहिजे हे पवारसाहेबांचे स्वप्न आहे यासाठी कामाला लागा असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मी अंगावर घ्यायला कुणालाही घाबरत नाही. आला अंगावर घेतला शिंगावर हा माझा स्वभाव आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

सत्ता नसताना आपल्या सोबत राहतात तेच खरे कार्यकर्ते असतात. त्यामुळे मी संघटना बांधणीवर जास्त लक्ष देणार आहे असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले. 15 वर्षात आपण काम केलं परंतु केलेल्या कामांची सर्वाना माहिती देण्यात आपण मागे पडलो आहोत. हेरीटेज इमारतींना 100 कोटींचा निधी अजितदादा पवार यांनी मुंबईला दिला आहे. आपल्या नेत्यांनी केलेले काम आपण लोकांपर्यंत पोचवायला हवे असेही अदिती तटकरे म्हणाल्या.

सोशल मिडियावर उत्साही कार्यकर्ते काहीतरी लिहितात परंतु त्याची दिलगिरी नेत्यांना व्यक्त करावी लागते. त्यामुळे त्याची काळजीही घ्यायला हवी. महिलांचे प्रश्न महिलांनी सोडवायला हवे त्यामुळे महिलांनी या प्रश्नावर जास्त लक्ष द्यायला हवे असे आवाहनही अदिती तटकरे यांनी केले. आम्ही सत्तेत असलो तरी संघटनेकडे लक्ष द्यायला हवे. आज संधी आपल्याला मिळाली आहे. योग्य व्यक्तीला योग्य पद देण्याचा निर्णय होईल असे मला वाटते असेही अदिती तटकरे म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...