नवी दिल्ली–
महाराष्ट्राच्या युवा सायकलीस्टने दिल्लीचे वेलाेड्रॅम ट्रॅकवरील आपला दबदबा कायम ठेवताना गुरुवारी साेनेरी यशाचा पल्ला गाठला. गत पदक विजेत्या पूजा दानाेळे, संज्ञा काेकाटे आणि आदिती डाेंगरेने खेलाे इंडिया युथ गेम्सच्या सायकलींगच्या पहिल्याच दिवशी गाेल्डन हॅट्ट्रिक साजरी केली. पूजा आणि संज्ञाने वयक्तिक प्रत्येकी एका सुवर्णपदकासह सांघिक गटातही चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. मुख्य प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय सायकलीस्ट पुजाने महिलांच्या स्क्रॅच रेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. पुरुषांच्या याच गटामध्ये महाराष्ट्राचा ओम कारंडे कांस्यपदक विजेता ठरला. तसेच टाइम ट्रायलमध्ये संज्ञाला आपला दबदबा कायम ठेवता आले. तिने प्रतिस्पर्धींना पिछाडीवर टाकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तसेच साेनेरी यशाची हीच लय कायम ठेवताना पूजा, संज्ञा यांनी आपली सहकारी आदितीसाेबत टीम स्प्रिंट गटात किताब पटकावला. यासह महाराष्ट्र संघाला पहिल्याच दिवशी घवघवीत साेनेरी यश संपादन करता आले.