पुणे- सराफी दुकानात चो-या करणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून जेरबंद करण्यात आले आहे. यावेळी आरोपींनी विविध गुन्ह्याची कबुली दिली असून, आरोपींवर अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
चेतन ऊर्फ राहूल बाबुराव कच्छवाय (वय 29, केशवनगर, मुंढवा मुळचा अहमदाबाद, गुजरात), सुचित्रा किशोर साळुंखे (वय 45, अकलुज, जि.सोलापुर), ज्योत्स्ना सुरज कच्छवाय (वय 26, अप्पर इंदिरानगर, बिववेवाडी), मंजीरी प्रशांत नागपुरे (वय 35, सुखसागरनगर, कात्रज), कोमल विनोद राठोड (वय 30, अप्पर इंदिरा, बिबवेवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक नांद्रे हे गस्त घालताना सराफ दुकानात दागिन्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी मुंढव्यातील केशवनगर भागात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांची अधिक चौकशी केली असता 11 सप्टेंबर 2016 रोजी ठाण्यातील वामन हरी पेठे या सराफ दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाणा करून दोन सोन्याच्या बांगड्या व नेकलेस चोरल्याची कबुली दिली. तसेच ठाणे, सोलापुर, मुंबई, केरला, गुजरात या ठिकाणच्या सराफ दुकानात जाऊन हात मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पण्ण झाले आहे.
तसेच यातील आरोपी ज्योत्स्ना व कोमल यांच्यावर रत्नागिरी, लांजा, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी अशाप्रकारचे सात गुन्हे नोंद आहेत. तर. आरोपी चैतन्य, सुचित्रा व मंजीरी यांच्यावर पुणे शहरात चार गुन्ह्यांची नोंद आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) दिपक साकोरे, उपायुक्त (गुन्हे) पी.आर.पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली युनीट पाचचे वरिष्ठ निरीक्षक एम.एम.मुजावार, सहाय्यक निरीक्षक महादेव वाघमोडे, हवालदार लक्ष्मण शिंदे, माणिक पवार, शिवाजी घुले, प्रदीप सुर्वे व त्यांच्या सहकार्यानी केली.

