पुणे ता१२ :नोटाबंदीच्या या निर्णयाने सर्वसामान्यांची काही काळ गैरसोय होईल, मात्र देशाच्या निरोगी अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे ‘शॉर्ट टर्म पेन आणि लॉन्ग टर्म गेन’ असेल. ह्या निर्णयामुळे व्याजदर कमी होईल आणि मासिक हफ्ता १५% पर्यंत खाली येईल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. क्रेडाई पुणे मेट्रोच्या
सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव अनुज भंडारी, डी. एस. कुलकर्णी यांच्यासह २०० हून अधिक विकसक यावेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, या निर्णयामुळे आपल्या सर्वांना आपल्या कामाची कार्यपद्धती बदलावी लागेल.येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या निर्णयाचे सकारात्मक फायदे ठळकपणे दिसू लागतील बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊन कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध
होईल. ज्याचा व्याजदर कमी होण्यात परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. या निर्णयामुळे सरकारचा कर महसूल मोठ्या प्रमाणावर
वाढेल.याशिवाय १-२% कर्जावरील व्याज दर कमी होण्याचा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला ज्यामुळे १% व्याज दर कमी झाल्यास म्हणजेच १५% हप्ता(ईएमआय) कमी होऊन पर्यायाने घरखरेदीदारांची क्रयशक्ती वाढेल. हाच पैसा पुढे सरकारला परवडणाऱ्या घरांसाठी(affordable housing), तरुणांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य
जनतेसाठीवेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून उपयोगात आणता येईल. वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.ते पुढे म्हणाले की, दहशतवादी कृत्यांना बनावट नोटांमध्ये पतपुरवठा होत होता आणि त्यातून दहशतवाद फोफावत होता, त्यालाही यामुळे आळा बसेल.
देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने(डिजिटल) घेऊन जाण्यासाठी हा निर्णय
महत्वाचा आहे. यामागे कॅशलेस पेक्षा लेसकॅश होणे जास्त गरजेचे असल्याचा सरकारचा मानस आहे. या एका निर्णयामुळे फक्त दिसणारा पैसा त्यावर आळा घालता येईल पण मालमत्ता स्वरूपातील
पैशावर अजून कारवाई करायची आहे, त्यामुळे ही लढाई अजून पूर्ण झालेली नाही.
घरात असणाऱ्या सोन्याबाबत ते म्हणाले की, यातील जास्तीत जास्त सोने
अर्थव्यवस्थेत आल्यास ती अधिक मजबूत होईल. यासाठी लोकांना याचे फायदे पटवून देणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. नोटबंदीच्या निर्णयावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या अनेक शंकांचेही जाधव यांनी निरसन केले.