विस्तारणाऱ्या पुण्यात घरांची मागणी कायमच राहणार : बापट
क्रेडाईच्या घर खरेदी उत्सवाचे उदघाटन
पुणे : आपले पुणे औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. इतरही क्षेत्रात पुण्याचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीसह पुण्यात मोठ्याप्रमाणात स्थलांतरही होत आहे. त्यामुळे पुणे विस्तारत आहे. येत्या ५० वर्षात येथे घरांची मागणी कायमच राहणार आहे. हे प्रामुख्याने मध्यम वर्गीयांचे शहर असेल. पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दवाढीमुळे पुणे परिसरातील ८००० चौरस किलोमीटर क्षेत्राचा सुनियोजित विकास होणार असल्याने, बांधकाम व्यवसायाला कायम मागणी असेल, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री व पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी एसएसपीएमएस येथे उदघाटन प्रसंगी केले.
क्रेडाई पुणे- मेट्रोतर्फे एसएसपीएमएस आयोजित केलेल्या घर खरेदी उत्सवाचे उदघाटन बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात १२० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे स्टोल आहेत. त्यात १००० हून अधिक बांधकाम प्रकल्पांची माहिती मांडण्यात आली आहे. येथील एसएसपीएमएस मैदानावर १७ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरु असेल. यावेळी क्रेडाई पुणे- मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, ” १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकार राज्यात सत्तेवर असताना पीएमआरडीए स्थापन होण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे पाठपुरावाही केला होता, पण १५ वर्षांपूर्वी या गोष्टीचे महत्व समजू न शकल्याने ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शक्ली नाही. त्या काळातच हा प्रकल्प अस्तित्वात आला असता त्यासाठी त्याकाळात हा प्रकल्प अस्तित्वात आला असता, तर पुण्याला आता ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या तेव्हाच सुटल्या असत्या. त्यानंतर पीएमआरडीए स्थापन झाल्यावरही त्याचा अध्यक्ष कोण असावा वगैरे राजकीय वादात हा प्रकल्प अडकला. आता पीएमआरडीए कार्यान्वित झाले आहे. निवासी क्षेत्र होण्याआधी, इमारती होण्याआधी रस्ते वगैरे पायाभूत सुविधांची गरज असते. पीएमआरडीएद्वारे याला निश्चित प्राधान्य मिळेल.
पीएमआरडीएचा अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम मी कार्यक्षेत्राच्या हद्दवाढीसाठी पाठपुरावा केला, असे सांगून बापट म्हणाले, कि पिंपरी-चिंचवडमध्ये जसा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला, तसा प्रश्न पीएमआरडीए संदर्भात होऊ नये, यासाठी मी हद्दवाढीचा पाठ पुरावा मुख्यमंत्रांकडे केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित ही मागणी मान्य केली. हद्दवाढीचा निर्णय झाला तोपर्यंत पीएमआरडीएच्या हद्दीत सव्वातीनशे गावे होती. आता या गावांची संख्या ७५० – ८०० पर्यंत पोहोचली आहे. आधी ३५० चौरस किलोमीटर क्षेत्रापासून ८०० चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत ही हद्दवाढ करण्यात आली. त्याचा विकास आराखडा (डीपी) एकाचवेळी करण्यावर भर राहील. एव्हड्या मोठ्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांचा सहभाग घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे अनेक बाबी समजतील. हा विकास आराखडा करताना काळजीपूर्वक पावले टाकली जात आहेत. पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या हद्दीतील रस्त्यांचा विकास आराखडा (डीपी) मंजूर होईल. रस्त्याचं जाळ झालं, की विकाससंदर्भातील ५० टक्के कामे होऊन सुनियोजित वाटचाल होते.
विकास आराखडा मंजूर करण्यापूर्वी संबंधिताना बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल. त्यांच्या सकारात्मक सूचना – मतांचा विचार केला जाईल व डीपीमध्ये त्याचा अंतर्भावही केला जाईल. मग हे करताना आराखडा मंजुरीसाठी महिना दोन महिने बिलंब लागला, तरी चालेल, असे सांगून बापट म्हणाले की क्रेडाईने सरकारला डीपीसंदर्भात टीपण द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे. अगदीच स्थानिक बाबींच्या सूचना नकोत पण टीडीआर, एफएसआय धोरण काय असाव, याबाबतीत क्रेडाईच्या सूचना सरकारला हव्या आहेत. त्यानंतर क्रेडाईसह पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिका पीएमआरडीएच्या समन्वयातून विकास आराखड्या संदर्भात पाच महत्वाच्या मुद्यांवर परिसंवाद घेतला जाईल. त्यातील विचार मंथनातून आलेल्या मुद्द्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे या आराखड्यात त्यांच्या समावेशासाठी पाठपुरावा घेतला जाईल.
कटारिया म्हणाले, “पुण्यात माहिती तंत्रज्ञानापासून (आयटी) ते मेडीकल टुरिझम अशा बर्याच क्षेत्रात तरुणांसाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच पुण्यातील लोकांचे गुणवत्तापूर्ण जीवनमान, सुसंस्कृतता यामुळे अबालवृद्धांचे या शहरात स्थायिक होण्यास प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे पुणे परिसरातील ८००० चौरस किलोमीटर हद्दीपर्यंत सुनियोजित विकास करण्याच्या नियोजनामुळे ४ – ५ पिढ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे पुण्यात घरांची गुंतवणूक फायद्याचीच असेल. पुढील ५० वर्ष बांधकाम क्षेत्राला प्रतिकूलता निर्माण होणार नाही. त्यासाठी क्रेडाईसारख्या बांधकाम क्षेत्रातील विश्वासू संस्थेतर्फे ग्राहकांसाठी आजपासून ३ दिवस मेगा प्रॉपर्टी एक्स्पो सुरु झाले आहे. येथे परवडणाऱ्या घरांची निवड करणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरेल.
अतुल गोयल म्हणाले, “बांधकाम व्यवसायही वाढत्या पुण्याची गरज आहे. त्यामुळे ग्राहकांनी रिअल ईस्टेटमध्ये गुंतवणूक करणे निश्चितच फायद्याचे ठरेल. सतीश मगर यांनी यावेळी आभार मानले.