दुकानासमोरील रस्त्यावर दुकानदारांनी टाकलेल्या जाळ्यांवर अतिक्रमण खाते कारवाई का करत नाही ?
पुणे-कुमठेकर रस्त्यावरील एका वस्त्रदालनासमाेर दुचाकी लावण्याच्या वादातून टोळक्याने दुकानदाराला बेदम मारहाण करुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दुकानातील आरशाची तोडफोड केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकास अटक केली असून साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमित राजेंद्र कंधारे (वय २५, रा. ६५७, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कंधारे याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सुरेश त्रिमल (वय ३७, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुमठेकर रस्त्यावरील तेजस्विनी सिल्क सेंटर या वस्त्रदालनासमोर कंधारेने दुचाकी लावली होती. दुचाकी लावण्यावरुन वाद झाला. त्यानंतर कंधारे आणि साथीदारांनी त्रिमल यांना बॅट; तसेच स्टीलच्या पाईपने मारहाण केली. टोळक्याने त्रिमल यांच्या भावाला मारहाण केली. पोलिसाकडे तक्रार केल्यास बघतो, अशी धमकी देऊन कंधारे आणि साथीदारांनी दुकानातील आरसा आणि कठड्याची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.
दुकांदारांच्या जाळ्यांमुळे अडविली जाते पार्किंगची जागा
दरम्यान या घटनेमुळे अनेक दुकानदारांनी पदपथाच्या पुढे दुकानाच्या दारासमोर टाकून ठेवलेल्या जाळ्या दुचाकी पार्किंग ची जागा अडवून टाकत असल्याचे वर्षानुवर्षे निदर्शनास आलेले आहे. मात्र यावर कारवाई महापालिकेचे अतिक्रमण खाते करत नाही .दुकानदारांचे दरवाजे आणि अन्य साहित्य देखील पदपथावर अतिक्रमण करून पुढे सरकलेले असतात यामुळे पदपथावरून पायी चालणे देखील कठीण होते , एकीकडे पायी चालणे कठीण होते तर दुसरीकडे दुचाकी लावणे मुश्कील होते अशा समस्यात अडकलेला ग्राहक किंवा नागरिक येथे हवालदिल होतो.त्यात आता बरेचसे मॉल बंद पडल्याने लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी पुन्हा वाढली आहे. याचा फायदा घेऊन काही व्यापारी देखील गैर वागत असल्याच्या तक्रारी आहेत . याकडे महापालिका आणि पोलीस दोघेही लक्ष देत नसल्याने सामान्य ग्राहकाच्या अथवा नागरिकाच्या पाठीशी कोणी उभे नसल्याचे देखील वारंवार दिसून येते आहे.

