छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस पत्र लिहिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वृत्तवाहिनीवर केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजप प्रवक्त्याच्या या वक्तव्याने यात भर घातली आहे.
जितेंद्र आव्हाड ,अमोल कोल्हे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत सोशल मिडिया वर प्रतिक्रिया नोंदविली आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते. मात्र, सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास पाच पत्र लिहिले होते.
सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केली आहे.
राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला वाटते शिवरायांबद्दल वक्तव्य करून जाणून बुजून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचे काम केले जात आहे. राज्यपालांना वरच्यांचा (दिल्ली) आशिर्वाद आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्र घडवणारे, महिलांना शिक्षण देणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांनी वक्तव्य केली होती. काल शिवाजी महाराजांबद्दलही वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला, ते संदेश देत आहेत की, महाराष्ट्राचे लोक माझे काहीही बिघडवू शकत नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेने जागे व्हावे, लक्षात घ्यावे. आम्ही तर छत्रपती शिवरायांसाठी खोट्या केसेस अंगावर घेऊन लढत आहोत.जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपला स्वाभीमान लाथाडला जातो. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत शिवरायांचे नाव या भुतलावावरून कुणीही मिटवू शकत नाही.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसं नसतील तर कठीण आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले, हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास सांगण्यात आला. या चित्रपटात खोटा इतिहास आहे, असे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज म्हणाले आहेत. तो चित्रपट पाहायला कोणीही जात नाहीये. मात्र अजूनही महाराष्ट्र शासन झोपले आहे. महाराष्ट्रात आता सर्वकाही चालत आहे.
अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं की, डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं. हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये, अशा शब्दात कोल्हे यांनी भाजपला खडसावलं.