शहरनिहाय आकडेवारी विकसकांना ठरेल दिशादर्शक
पुणे ता. २: भविष्यकालीन निर्णय प्रक्रियेत बांधकाम व्यावसायिकांना दिशादर्शक ठरणारे चालू बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय क्रेडाई महाराष्ट्रने घेतला आहे. असे सर्वेक्षण प्रथमच होत असून याचा अहवाल येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना कटारिया म्हणाले की, सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून राज्यातील एकूण ५० प्रमुख शहरात हे सर्वेक्षण केले जात आहे. त्या शहरातील विक्री झालेली घरे, विक्री न झालेली घरे, दुकाने, व्यावसायिक जागा, कार्यान्वित प्रकल्प आदीची आकडेवारी या सर्वेक्षणातून पुढे येणार आहे. क्रेडाई महाराष्ट्रच्या संशोधन आणि विकास समितीमार्फत हे सर्वेक्षण प्रमाणिकृत प्रकल्पांच्या ठिकाणी केले जात असून यासाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींची टीम कार्यरत झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, या सर्वेक्षणामुळे व्यावसायिकांना आगामी काळातील निर्णय घेणे सोपे होईल. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन कोणत्या भागात, कोणत्या प्रकारातील प्रकल्पाची बांधणी करावी, यांसारखे भविष्यकालीन निर्णय व्यावसायिकांना घेता येतील. मागणी आणि पुरवठा याचा अचूक अंदाज आल्याने संभाव्य धोके व्यावसायिकांना टाळता येतील. क्रेडाईकडून केले जाणारे सर्वेक्षण अधिकृत व खात्रीशीर असल्याने शासनालाही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना ही आकडेवारी फायद्देशीर ठरेल, असेही कटारिया यांनी सांगितले. तसेच या सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याने या कामाची आढावा बैठक येत्या गुरुवारी (दि. ५) पार पडणार असल्याची माहिती देखील कटारिया यांनी यावेळी दिली.